बुलढाणा : गत दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रामुख्याने मेहकर, लोणार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. निसर्गाच्या काही तासांमध्येच तब्बल २३ हजार पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
रोहिणी, मृग नक्षत्रामध्ये रुसलेला पाऊस जून अखेरीस जोरदार बरसला. २५ जून पासून सायंकाळी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला संततधार स्वरूपाच्या पावसाने नंतर रौद्ररूप धारण केले होते. ३ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असताना अतिवृष्टीने २३ हजार ३३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
गत दोन दिवसातील पावसाने चार तालुक्यातील २०९ गावे बाधित झाले आहे. यात बुलढाणा १, मेहकर सर्वाधिक १६१, लोणार ३५, सिंदखेड राजा १२ असे एकूण २०९ गावे बाधित झाले आहेत. सोयाबीन, मूग, उडीद, तूर, हळद,भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले असून, मेहकर तालुक्यात सोयाबीनचे दीड हजार हेक्टरवर झालेल्या पेरण्या पाण्याखाली आहे. तालुक्यातील २३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टी बाधित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यामुळे तब्बल ४८ हजार शेतकरी बाधित झाले आहे.
सद्यस्थितीत ४९ टक्के खरीपाची पेरणी पूर्ण झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १२८ मिमी पावसाची नोंद झाली असून, सहा तालुक्यात ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये चिखली ७० मिमी, बुलढाणा ७४मिमी, देऊळगाव राजा ७४.५ मिमी, मेहकर ८३ मिमी, सिंदखेड राजा ७३ मिमी, लोणार ९७ मिमी अशा पावसाची नोंद करण्यात आली आहे. मेहकर आणि लोणार तालुक्यात सर्वाधिक अनुक्रमे ८३ मिमी, ९६ मिमी असा पाऊस झाला आहे.