बुलढाणा : मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदान, मुंबई येथील बहुचर्चित वादळी आंदोलन संपले. या विरोधात विविध समूहांतील ओबीसी नेत्यांनी उपराजधानी नागपूर येथे सुरू केलेले साखळी उपोषणदेखील मागे घेण्यात आले.
मुंबईत मंत्रिमंडळ उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्या हाती शासन निर्णय सोपविल्यावर त्यांनी बेमुदत उपोषण सोडले. मात्र, यानंतरही आरक्षणवरून राज्यात निर्माण झालेले राजकीय, सामाजिक वादळ, वाद-वादंग संपायला तयार नाहीत, असे सार्वत्रिक चित्र आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणविषयक शासन निर्णयाची (अध्यादेशाची) प्रत फाडल्यावर वातावरण चांगलेच तंग झाले आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे. दूरवरचा बुलढाणा जिल्हादेखील याला अपवाद ठरला नाहीये.
लक्ष्मण हाके यांच्यावर याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करणारी लेखी तक्रार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. आज शुक्रवार, ५ सप्टेंबरला दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते मनोज ढगे पाटील यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. तक्रारदार मनोज ढगे पाटील यांनी तक्रार दिल्यावर प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि राज्यात दंगलसदृश परिस्थिती निर्माण होईल, असे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सोबतच शासनाने काढलला अध्यादेश फाडल्याने त्यांनी संविधानाचाही अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आपली मागणी आहे. यावरून खामगाव पोलीस गुन्हा दाखल करतात का, याकडे लाखो जरांगे आणि हाके समर्थकांचे लक्ष लागले आहे.