बुलढाणा : नक्षलग्रस्त गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व सध्या बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून एक महिला पोलीस कर्मचारी देखील विशेष सेवा पदकाची मानकरी ठरली आहे.
सध्या बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांनी मार्च २००१ ते मार्च २००४ दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात केशोरी पोलीस ठाणे गोठणगाव चौकीत काम केले आहे. नक्षलग्रस्त भागात तीन वर्ष सेवा देताना नक्षल विरोधी अभियान राबवून शांतता स्थापित केली. ७९ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे मदत केली. ही सर्व ७९ मुले सध्या शासकीय सेवेत आहेत. गाव तिथे ग्रंथालय राबवून जनमानसात पोलीस दलाविषयी विश्वास निर्माण केला. त्यांच्या सोबतच रामेश्वर आंधळे, पंचगंगा भोजणे आणि सुपाजी तायडे यांनाही विशेष पोलिस सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यांनी ‘कम्युनिटी पोलिसिंग ‘च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा सामान्य जनतेला लाभ मिळवून दिला. गोपनीय माहिती वरिष्ठांना सादर केली. यामुळे नक्षल्यांच्या कारवायांना प्रतिबंध घालण्यास यश मिळाले.
किसन आंधळे यांनी पोलीस मदत केंद्र हेड्री, सी ६० प्राणहिता मध्ये दोन वर्षे काम केले असून ते सध्या बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. सध्या जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कार्यरत सुपाजी तायडे गुप्तहेर शाखेत काम केले आहे. गडचिरोली मधील कल्याण शाखा, निवडणूक शाखामध्ये महिला चालक म्हणून काम करणाऱ्या पंचगंगा भोजने या सध्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे कार्यरत आहेत. या चौघांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याबद्धल पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, उपअधीक्षक बाळकृष्ण पावरा यांनी त्यांचे अभिनंदन केले.