बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली करण्यात आली आहे. केवळ आठ महिन्यातच पानसरे यांची बुलढाणा येथून बदली झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस दलात  उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. विश्व पानसरे यांच्या जागी  जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून आता नीलेश तांबे त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्याला दीर्घ काळानंतर भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी मिळाला आहे.

आज गुरुवारी  गृह  मंत्रालयाने  बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहे.  जेमतेम आठ महिन्यात पोलीस अधीक्षक पानसरे यांची झालेली बदली चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, त्यांची बदली   दुय्यम शाखेत करण्यात  आली आहे.  त्यांची अमरावती येथील राज्य राखीव दल  गट क्रमांक ९ येथे समूपदेशक म्हणून  झाली आहे. पोलीस विभागच नव्हे राजकीय वर्तुळात देखील या बदलीची चर्चा आहे.

१३ ऑगस्ट २०२४ रोजी विश्व पानसरे यांची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अवघ्या ८ महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांचा बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकाळ वाढत्या गुन्हेगारीने  आणि समिश्र कामगिरीने चर्चेत राहिला. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्ह्याच्या वाढत्या गुन्हेगारीवर विधानसभेत लक्षवेधी लावत पोलीस दलाचे वाभाडे काढले. यामुळे देखील खळबळ उडाली होती.  दरम्यान बुलढाण्यात बदलून  येत असलेले  नूतन पोलीस अधीक्षक  नीलेश तांबे हे २०१८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. नंदुरबार येथे त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.  त्यानंतर नागपूर येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी राहिली आहे.  कृष्णप्रकाश यांच्यानंतर बुलढाणा जिल्ह्याला पहिल्यांदाच भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी एसपी म्हणून मिळाले आहेत.