बुलढाणा : साखरखेर्डा-दुसरबीड मार्गावरील दुसरबीड उड्डाणपूलाजवळ भरधावं दुचाकी रस्ता दुभाजक ( डिव्हायडर) वर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले.वाहनाची धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे तीन तुकडे झाले आणि घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले. यामुळे घटना स्थळी दाखल झालेल्यांच्या जीवाचा थरकाप उडाला.
काल शुक्रवार रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका जबरदस्त होता की दुचाकीचे तीन तुकडे झाले, तर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. शेख आरिफ शेख कादर (वय ३५ वर्षे) आणि शेख अल्ताफ शेख अक्रम (वय २८ वर्षे) ,अशी मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहे. दोघे मृतक युवक साखरखेर्डा ( तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा) येथील रहिवासी आहेत. दरम्यान या दोघांवर आज शनिवारी, १ नोव्हेबर रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे एका विवाह सोहळ्यानिमित्त साखरखेर्डा येथून दुसरबीड ( तालुका सिंदखेड राजा )येथे दुचाकीने जात होते. दरम्यान मोटार सायकल ( क्र एम एच २८-बीजे -४०२९) समृध्दी महामार्गाला जोडणाऱ्या मार्गावरील दुभाजकावर जोरात आदळली . या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आज शनिवारी दुपारी साखरखेर्डा येथे दोन्ही मृतकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाहन चालकाची आत्महत्या साखरखेर्डा नजीकच्या गुंज येथील रहिवासी व चालक असलेल्या विठ्ठल मोतीराम तुपकर (वय ३०) याने स्वतः च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शनिवारी, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. विठ्ठल तुपकर हा रात्री घरून निघून गेला होता. सकाळी त्याचे वडील मोतीराम तुपकर त्याला शोधण्यासाठी गेले. यावेळी विठ्ठल हा शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसला. गतवर्षी त्याने नंदूरबार जिल्ह्यातील एक ‘क्रुझर’ खरेदी केली होती. मात्र यात फसवणूक झाल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचे कुटूंबियांनी सांगितले. विठ्ठल हा संभाजीनगर साखरखेर्डा मार्गावर प्रवाशी वाहन चालवित होता. उत्तरीय तपासणीनंतर त्याचेवर शोकाकुल वातावरणात गुंज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे मागे आई वडील एक मुलगा एक मुलगी भाऊ असा परिवार आहे.
