बुलढाणा : मागील १ तारखेपासून जिल्ह्यात अधूनमधून धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाने आज सोमवारी (१२ मे) बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार हजेरी लावली.लोणार तालुक्यातील बिबी परिसरात झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज अंगावर पडून एक शेतकरी महिला ठार झाली तर सहा शेतमजूर महिला जखमी झाल्या आहे. दुसरीकडे वादळी पावसामुळे पिकांचे आणि आंब्यांचे नुकसान झाले आहे. आज (१२ मे) बुलढाणा जिल्ह्याच्या घाटावरील काही तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.
बुलढाणा शहर परिसरातील अनेक गावात दुपारी पावसाने हजेरी लावली. बुलढाणा शहरात पावसाने जोरदार वाऱ्यांसह पंचवीस मिनिटे हजेरी लावली. चिखली शहर व परिसरात हजेरी लावली. लागूनच असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा गाव आणि परिसरातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कमी अधिक एक तास हजेरी लावली.
लोणार तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. लोणार शहरात सौम्य स्वरूपाचा पाऊस होता. मात्र ग्रामीण भागातील बीबी, चोर पांग्रा सारख्या अनेक गावात पावसाचा जोर जास्त होता. चोर पांग्रा येथे वादळी वाऱ्यासह दुपारी दोन वाजताच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. पाहतापाहता पावसाने जोर धरला.
या अचानक बदललेल्या हवामानाने शेतकऱ्यांची धावपळ उडवली. वीरपांग्रा येथील गट क्रमांक ९२ मधील देविदास चतरू चव्हाण यांच्या शेतात कापसाची वेचणी सुरु होती. त्यांच्या सून रंजना संदीप चव्हाण (वय ३५) यांच्यासह एकूण सात महिला वेचणी करीत होत्या .यावेळी त्यांच्यावर वीजेचा लोळ अंगावर कोसळून रंजना चव्हाण या जागीच दगावल्या. त्यांच्या सोबतच्या सहा महिला अंतरावर असल्याने आणि नशीब बलवत्तर म्हणून बचावल्या. मात्र त्या होरपळल्याने जखमी झाल्या आहे. त्यांना उपचारसाठी नजीकच्या बीबी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसापूर्वीच या परिसरात अवकाळी पावसाने गारपीट सह हजेरी लावली होती.
शेतकऱ्यांना फटका
अवकाळी पावसामुळे सामान्य नागरिकांना उन्हाच्या तापापासून दिलासा मिळाला असला तरी लग्नसराईतील नियोजन कोलमडले आहे.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. कांदा, भुईमूग आणि उन्हाळी ज्वारी पिकांचे नुकसान झाले असून, काढणीला आलेले भुईमूग पावसात भिजल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामानातील हा अचानक बदल शेतीसाठी घातक ठरत असून, शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि हताशा पसरली आहे.प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करत आहेत.