बुलढाणा: आत्महत्या म्हणजे काही अपरिहार्य कारणामुळे स्वतःच्या जीवनाचा अंत करून घेणे. एका असहाय क्षणी आपल्या जीवाचा अंत करून घेणारे मोठ्या पदावरील, मोठ्या समुदायचे नेतृत्व करणारे ख्यातनाम व्यक्ति देखील असतात. दुसरीकडे अगदी सामान्य परिस्थितील व्यक्तीदेखील आत्महत्या करून आपल्या समस्यातून स्वतःची सुटका करून घेतात.

मात्र, आज शेगाव, खामगाव परिसरातील आणि मध्य रेल्वे विभाग अंतर्गत येणाऱ्या जलंब रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या आत्महत्येच्या घटनेने जलंब परिसरच नव्हे खामगाव व शेगाव तालुका देखील हादरला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

झाले तरी काय?

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, शेगाव, जलंब रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या घटना अधूनमधून घडतच असतात. मात्र आजची आत्महत्येची घटना एकाच वेळी जीवाचा थरकाप उडविणारी आणि आईच्या मायेची प्रचिती आणणारी आहे. या घटनेचा विस्तृत तपशील येथे मिळाला नाही. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार आज गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी एका महिलेने जलंब रेल्वे स्टेशनवर मालगाडीच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा जागीच भीषण व करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव कल्पना विठ्ठल घुले (वय अंदाजे २२ वर्षे) असल्याचे निष्पन्न झाले. ती महिला शेगाव तालुक्यातील जलंब येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.

यावेळी प्लॅटफॉर्मच्या बाजूला असलेल्या आसनावर (बेंच वर) एक लहान मुलगा रडताना आढळून आला. तो चिमुकला मुलगा आत्महत्या करणाऱ्या महिलेचा असल्याचे उघड झाले. प्राथमिक अंदाजानुसार ही महिला काही अज्ञात कारणामुळे आत्महत्या करण्याच्या निर्धाराने मुलाला कडेवर घेऊन रेल्वे स्थानक परिसरात पोहोचली. तिने कदाचित लेकरासह रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचे ठरविले होते. मात्र एनवेळी तिच्यातील माता जागृत झाली आणि मुलाचा जीव का घ्यायचा असा विचार तिच्या मनात आला असावा अशी चर्चा आहे. यामुळे तिने अजाण मुलाला बाकड्यावर बसवून स्वतः मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली. यामुळे या मातेचा मृत्यू झाला अन तिचे लेकरू बचावले. मात्र तो निष्प्पाप जीव मात्र आईच्या मायेला कायमचा मुकला. या पोरक्या मुलाकडे पाहणाऱ्या शेकडो प्रवाश्यांचे आणि ग्रामस्थांचे डोळे पानावले. त्यांना गहिवरून आल्याचे चित्र दिसून आले. यामुळे जलंब परिसरासह शेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या अगळ्यावेगळ्या आत्महत्येची आणि मरणाच्या दारात देखील पुत्रावरील माया दाखविणाऱ्या आईच्या प्रेमाची परिसरत चर्चा होत आहे.