नागपूर : कोळसा घोटाळ्यातील मोठे नाव, नागपूरचे उद्योजक आणि कॉर्पोरेट पॉवर लिमिटेडचे प्रोमोटर मनोज जयस्वाल यांना कोलकाता येथील केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय) पथकाकडून शुक्रवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. जयस्वाल यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक झाली, याची मात्र तपास यंत्रणेने अतिशय गोपनियता बाळगली. प्रकरणाचा कुठलाही तपशील पथकाने स्थानिकि अधिकाऱ्यांनाही दिला नाही.
कोट्यवधी रुपयांचा कोसळा घोटाळा आणि बँक फसवणूक प्रकरणात २०२२ साली सीबीआयने त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यासंदर्भातच ही कारवाई झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सीबीआयच्या कोलकाता पथकाने अतिशय गोपनियता बाळगत नागपुरात येऊन ही कारवाई केली. मात्र कारवाईला दुजोरा देताना सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आधी जयस्वाल यांच्या निवासस्थानी छापा टाकला. नंतर एका हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेतले गेले. तपास यंत्रणेचे पथक त्यांना पुढील चौकशीसाठी कोलकाता येथे घेऊन गेले आहे. नागपुरातील पथकाला केवळ कारवाईची सुचना देण्यात आली होती. इतर कोणताही तपशील कोलकाताच्या पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांना दिला नव्हता.
जयस्वाल प्रमोटर असलेली कॉर्पोरेट पॉवर लिमिटेडचे मुख्यालय कोलकातातल्या सॉल्ट लेक येथे आहे. संबंधित कंपनीने विविध बँकांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे ४ हजार ३७ कोटींचे कर्ज उचलले होते. यासंदर्भात युनियन बँक ऑफ इंडियाचे तत्कालिन उपमहाव्यवस्थापक टी.दीना दयाल यांच्या तक्रारीवरून २० डिसेंबर २०२२ ला जयस्वालसह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
सक्त वसुली संचालनालयाननेही नंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात जयस्वाल यांच्यावर ही कारवाई झाली असण्याची शक्यता आहे. मात्र पथकाने अतिशय गोपनियता बाळगत याबाबत कोणताही तपशील दिला नाही. कोळसा खाण ब्लॉक वाटप प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने यापूर्वी त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
जयस्वाल यांनी विजय दर्डा यांच्यासोबत एकत्र येत कोळशाचा उद्योग सुरु केला होता. त्यांनी अवघ्या दोन ते तीन वर्षात देशभरात विविध ठिकाणी प्रकल्प सुरु केल्याने त्यांच्याकडे इितक्या मोठ्या स्वरुपात रक्कम आली कुठून? असा सवालही त्यावेळी उपस्थित झाला होता.