बचाव पथकाला माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन
नागपूर : महाराजबागेजवळील पत्रकार वसाहतीच्या मागे असलेल्या नाल्यात गेल्या काही दिवसांपासून मगरीचे वास्तव्य असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या मगरीच्या शोधासाठी वनखात्याने आता याठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवले आहेत.
शहरातील पत्रकार सहनिवासलगतच्या नाल्यात २८ ऑक्टोबरला परिसरातील नागरिकांना मगर दिसली. स्थानिकांकडून वनखात्याला याची माहिती मिळाली. नागपूर वनखात्याचे बचाव पथक आणि अधिकारी, कर्मचारी यांना तातडीने घटनास्थळी भेट दिली. नाला आणि लगतच्या परिसराची पाहणी करून त्यांनी शोध मोहीम राबवली. नाल्यालगतच्या वसाहतीतील स्थानिक नागरिकांची वनकर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन खबरदारीच्या उपाययोजना, दक्षता आणि काळजी घेण्याबाबतचे आवाहन केले. वनखात्याचे बचाव पथक, अधिकारी व कर्मचारी सातत्याने शोध मोहीम राबवत आहेत. या पथकाला अजूनपर्यंत मगर दिसून आलेली नाही. मात्र, वनखात्याने मगरीच्या हालचाली टिपण्याकरिता या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. वनखात्याने नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आणि मगराची हालचाल निदर्शनास आल्यास वनखात्याचे बचाव पथक ०७१२-२५१५३०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे. नाल्यामध्ये न उतरण्याबाबत जाहीर आवाहनही केले आहे.