लोकसत्ता टीम

नागपूर : वाहतूक पोलीस सुरुवातीला ध्वनिप्रदूषण करणाऱ्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई करीत होते. मात्र, त्याचा हवा तेवढा परिणाम दिसत नव्हता. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी दुचाकींचे आवाज करणारे सायलेन्सर जप्त करण्याची कारवाई सुरू केली. आता दुचाकीला आवाज करणारे सायलेन्सर बसवून देणाऱ्या मॅकेनिकवरही पोलीस कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

शहरातील युवावर्गांमध्ये महागड्या दुचाकी वापरण्याची ‘फॅशन’ आली आहे. त्यातही बुलेटसारख्या मोठ्याने आवाज करणाऱ्या दुचाकींची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फट्ट असा मोठ्याने आवाज काढणारे सायलेन्सर बसवण्याची ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे. रस्त्याने जाताना अचानकपणे जवळ आलेल्या बुलेटमधून मोठ्याने फटाके फोडल्याचा फट्ट असा काढून नागरिकांना दचकवणे किंवा घाबरवण्याचा प्रकार बुलेटचालक करतात. फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव, व्हीआयपी मार्ग, सीताबर्डी, धरमपेठ, रामदासपेठ अशा दाट वस्तीत जाऊन बुलेटचालक सायलेन्सरमधून फटाक्याचा आवाज काढून सामान्य नागरिकांना त्रास देतात.

आणखी वाचा-नागपूर : विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकाचा परवाना निलंबनाबाबत हालचाली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संरचनेत बदल करून आवाज करणारे सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीचालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. गेल्या दोन वर्षापासून जवळपास २० हजार दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच त्या दुचाकींचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. आता शहरातील नऊ वाहतूक परिमंडळात शेकडो सायलेन्सरचा ढीग पडला आहे. त्यामुळे वाहतूक कार्यालयातील मोठी जागा व्यापली गेली आहे. ते सायलेन्सर नष्ट करण्यास परवानगी मिळत नसल्यामुळे वाहतूक पोलिसांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

विल्हेवाट का नाही?

शहरात आवाज करणाऱ्या बुलेटचालकांवर वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाई करतात. संरचनेत बदल करून विशेषरित्या तयार करून घेतलेले (मॉडिफाईड) आवाज करणारे सायलेन्सर पोलीस जप्त करतात. मात्र, त्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे वाहतूक कार्यालयात शेकडो सायलेन्सर भंगारात पडून आहेत.