विधान परिषदेसाठी आज १५ केंद्रांवर मतदान

नागपूर : सुरुवातीपासून नाटय़मय घडामोडींमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यतील ५५९ मतदार शहरातील तीन व ग्रामीणमधील १२ अशा एकूण १५ केंद्रांवर मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावापुढे पसंतीक्रम लिहून त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतील. जिल्हा निवडणूक यंत्रणेने यासाठी सर्व तयारी केली आहे.

या निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस समर्थित अपक्ष मंगेश देशमुख व छोटू भोयर रिंगणात आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच काँग्रेसमध्ये उमेदवाराच्या संदर्भात घडणाऱ्या घडामोडी, ऐनवेळी काँग्रेसने अपक्ष मंगेश देशमुख यांना दिलेला पाठिंबा व भारतीय जनता पक्षाने त्यांच्या गटातील मतदारांना घडवून आणलेली परराज्याची सहल यामुळे या निवडणुकीने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. निवडणुकीसाठी मतदारांची एकूण संख्या ५६० मतदार निर्धारित केली होती. मात्र हिंगणा पंचायत समितीच्या सभापती या प्रभारी असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार आयोगाने नाकारला. त्यामुळे संख्या एकने कमी होऊन ती ५५९ झाली. एकूण १५ मतदान केद्रांवर (शहरात ३, ग्रामीण १२) मतदानाची सोय करण्यात आली असून तेथे सकाळी ८ पासून मतदानाला सुरुवात होईल व ते दुपारी ४ पर्यंत चालेल. निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार मतदानासाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण केल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी विमला आर. यांनी सांगितले. मतदानादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणूक चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान आहे. मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करायचे आहे. त्यासाठी त्यांना जांभळ्या शाईचा पेन देण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी विमला आर. यांनी गुरुवारी मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला. मतदान संपल्यावर मतपेटय़ा जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील स्टॉँगरूम मध्ये ठेवण्यात येणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बचत भवन परिसराची पाहणी केली.१४ डिसेंबरला याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

सर्व मतदान केंद्र तहसील कार्यालयाच्या जवळ असल्यामुळे १० डिसेंबरला नागपूर शहर व ग्रामीणसह नरखेड, काटोल, रामटेक, उमरेड, मौदा, पारशिवनी, येथील सेतू केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी सांगितले.

दोन ओळखपत्रांची गरज

मतदारांना निवडणूक आयोगाचे तसेच ते ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी आहेत त्याचे ओळखपत्र मतदानासाठी सोबत आणावे लागेल. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. अन्य पुरावा ग्रा धरला जाणार नाही

मोबाईलवर बंदी

मतदान करताना मतदारांना मोबाईल फोन, छुपा कॅमेरा, कॅमेरा असलेला पेन, टॅब तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक केंद्रावर एक पथक तैनात करण्यात असणार आहे.

मतदान केंद्र

महापालिका सदस्य- उपविभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन्स, तहसील कार्यालय (खोली क्रमांक २ व ४)

जि.प. सदस्यांसाठी- ग्रामीण तहसील कार्यालय, आमदार निवासाजवळ (खोली क्रमांक १)

नगरपालिका/ नगरपंचायत- नरखेड, काटोल, सावनेर, रामटेक कामठी, कळमेश्वार, उमरेड, मौदा, पारशिवनी येथील स्थानिक तहसील कार्यालय, नगर परिषद कन्हान, नगर परिषद बुटीबोरी, नगरपरिषद वानाडोंगरी.

करोना संशयितांसाठी शेवटच्या तासात मतदान

या निवडणुकीमध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात आल्या आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग केले जाईल. शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आढळल्यास अशा मतदारांना शेवटच्या एका तासामध्ये मतदान करता येणार आहे.