लोकसत्ता टीम

यवतमाळ : पंजाबचे व्यापारी नागपूर येथे जात असताना त्यांची भरधाव इनोव्हा कार वर्धा नदीच्या पुलावरून थेट खाली कोसळली. कळंबपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या यवतमाळ-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीजवळ झालेल्या या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली.

सुशील शिवाजी जगताप (४०, रा. लुधियाना) व हेमंत ठोंबरे (४१, रा. लुधियाना, पंजाब) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात कुशल सिंग रेसपाल सिंग (५७) हा व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे तिघे मित्र असून, कपड्याचे व्यापारी आहेत. इनोव्हा कार (क्र. पीबी- २३ क्यू – ९४५६) ने ते जळगाववरून कामानिमित्त यवतमाळला आले होते. बुधवारी सायंकाळी यवतमाळवरून नागपूरला निघाले.

आणखी वाचा-तलाठी भरतीत घोटाळ्याची व्याप्ती वाढली, लातूर येथील परीक्षा केंद्राच्या मालकाचे नातेवाईक टॉपर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान वर्धा जिल्ह्यातील शिरपूरजवळील वर्धा नदीवरील पुलाजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगातील कार पुलावरून थेट खाली नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. याबाबत पुढील तपास कळंब येथील ठाणेदार दीपमाला भेंडे करीत आहेत. हा अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंजाबमध्ये त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली.