यवतमाळ: महागाव तालुक्यातील अमडापूर सिंचन प्रकल्पाच्या कालव्याकरिता सक्तीने अधिग्रहित करण्यात येत असलेल्या जमिनीचे मोजमाप सुरू असताना शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विरोध केला. दरम्यान, उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसमोरच एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती.

फुलसावंगी येथे बुधवारी दुपारी येथे ही घटना घडली. आता या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्याद प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता हेमंत कोल्हे यांनी महागाव पोलिसांत दिली. त्यावरून फुलसांगी येथील १२ शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असताना शेतकऱ्यांनी शिवीगाळ केली व असंवैधानिक भाषेचा वापर करत शेतात आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. संतप्त शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी व पोलीस समजावण्याचा प्रयत्न करीत असताना अर्वाच्च भाषेचा वापर करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला, अशा आशयाच्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी बाबू खान जमाल खान (५०), शेख रियाज शेख नवाब (४०), आमिर खान बाबू खान पठाण (३२), मोइन खान मुस्तफा खान (३५), मोसिन खान मुस्तफा खान पठाण (३२), शाहरूख खान असलम खान पठाण (२७), सर्व रा. फुलसावंगी इतर तीन पुरुष व तीन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्यांच्याविरुद्ध कलम १३२, १८९ (२), ३५१ (२), ३५२ बीएनएसप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

फुलसावंगी येथील गट क्र. १३८ येथे मोजणी सुरू असताना शेतकऱ्यांच्या जमावाने केलेल्या विरोधामुळे सक्तीच्या भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी करता आली नाही. अशातच मोजणीला विरोध करत असताना शेतकरी शाहरूख खान असलम खान पठाण यांनी अधिकाऱ्यांसमोरच विष प्राशन केल्याने खळबळ उडाली होती. शेतकरी आणि पोलीस प्रशासन यांच्यात वादावादी झाली होती. उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही बोलावण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरापर्यत मोजणीची प्रक्रिया सुरू होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या प्रकरणात शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. फुलसावंगी हे गाव अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. अमडापूर प्रकल्पामुळे या भागात शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद सरकाटे करीत आहेत.