भंडारा: एका पंधरा दिवसाच्या बाळाची शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अवैध पद्धतीने दत्तक घेतल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर ७००० रुपयात एका बाळाची विक्री झाल्याची तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने चाईल्ड हेल्प लाईन भंडाराचे कर्मचारी यांचे कडून प्राथमिक माहिती घेण्यात घेण्यात आली. त्यामध्ये बालकास दत्तक दिल्याचे माहिती झाले.
सदर प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांचे कडुन पुरावे गोळा करण्यात आले. त्यात साकोली तालुक्यातील एका उपकेंद्रात एप्रिल २०२४ मधे जन्म झालेल्या एका बाळाला १५ दिवसाचा असतांना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दत्तक लिहुन देण्यात आले. दत्तक घेतलेल्या पालकाकडुन अवैध पद्धतीचा अवलंब करून भंडारा शहरातील नामांकित खाजगी हास्पिटल मध्ये प्रसुती झाल्याचे दस्तावेज दाखवुन नगर परिषद भंडारामधुन नविन जन्म प्रमाणपत्र तयार केले.
सदर प्रकरणात न्यायालयाचे कोणत्याही आदेश प्राप्त न करता आपसी पद्धतीने अवैध पद्धतीचा अवलंब करून बालकास दत्तक घेण्यात आले. या प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांचेकडून पोलिस स्टेशन साकोली येथे राजपाल हरीचंद रंगारी वय ४७ वर्षे, सुचिता हरीचंद रंगारी वय ४४ वर्षे रा. हसारा ता. तुमसर, अजित पतीराम टेभुर्णे वय ३५ वर्षे, सोनाली अजित टेंभुर्णे वय २५वर्षे , नंदकिशोर मेश्राम वय ४५ वर्षे, राकेश पतीराम टेभुर्णे वय ३२ वर्षे, पुष्पलता दिलीप रामटेके वय ५० वर्षे रा. घानोड ता. साकोली यांचे विरूद्ध जे.जे. अक्ट २०१५ च्या कलम ८० व ८१ अन्वये गुन्हा करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात सहाय्यक आयुक्त योगेश जवादे महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण बांदुरकर तसेच बाल कल्याण समिती अध्यक्ष सानिका वडनेरकर , सदस्य मृणाल बांडेबुचे, महेश सातव, मेघा खोब्रागडे यांचे मार्गदर्शनात लोकप्रिया देशभ्रतार समन्वयक चाईल्ड हेल्प लाईन विजय रामटेके, विक्की सेलोटे, सुनील राने यांनी हे प्रकरण उजेडात आणले.