अकोला : मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सुविधेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नागपूर दरम्यान सहा अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक ०२१०१ विशेष २२ ऑगस्ट ते ०५ सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवार रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ००.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी नागपूर येथे १३.४० वाजता पोहचेल. या गाडीच्या एकूण तीन सेवा होणार आहेत. गाडी क्रमांक ०२१०२ विशेष दिनांक २२ ऑगस्ट ते ०५ सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवार रोजी नागपूर येथून १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे ०५.०० वाजता पोहचेल. या गाडीच्या देखील तीन सेवा होतील. या विशेष गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा येथे थांबा राहणार आहे. या गाडीची संरचना एक वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, नऊ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक द्वितीय आसन व्यवस्थासह व सामान गार्ड ब्रेक व्हॅन अशी राहील. या अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल व एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार आकारले जाईल. या विशेष गाड्यांचे थांबे व वेळांचा तपशील पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्यांमध्ये वाढ होणार
विविध रेल्वे गाड्यांना कायमस्वरूपी तीन अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने सामान्य श्रेणीतील प्रवाशांच्या सोयीसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. नांदेड – मनमाड पॅसेंजर, पूर्णा-आदिलाबाद पॅसेंजर, आदिलाबाद-परळी पॅसेंजर, परळी – अकोला पॅसेंजर, पूर्णा – अकोला पॅसेंजर, पूर्णा-परळी पॅसेंजर, परळी-पूर्णा पॅसेंजर आदी गाड्यांना कायमस्वरूपी जनरल श्रेणीचे तीन अतिरिक्त डबे जोडण्यात येत आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवासी आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये ‘अलार्म चेन पुलिंग’ (एसीपी) च्या वाढत्या घटनांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणांमध्ये जानेवारी ते जुलैपर्यंत एकूण ३२० दोषींना अटक करण्यात आली आणि १०३ दोषींवर यशस्वीरित्या कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.