नागपूर : पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने गेल्या दहा वर्षांत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात तिसऱ्या रेल्वेमार्गाचे केवळ ५३.५४ किलोमीटरचे काम झाले आहे, तर चौथ्या रेल्वेमार्गाचा अजून ठावठिकाणा नसल्याचे माहिती समोर आली आहे.

नागपूर-वर्धा, नागपूर-इटारसी तसेच नागपूर ते बल्लारपूर असा तिसरा रेल्वेमार्ग टाकण्याची घोषणा २०१२ झाली. त्याचे कामही सुरू झाले असून निधीची अडचण असल्याने अतिशय संथगतीने काम सुरू आहे. परिणामी, नागपूर विभागात सोनेगाव ते हिंगणघाट दरम्यान १६.१७ किलोमीटर तर कोहली ते काटोल दरम्यान २५ किलोमीटर आणि नरखेड ते कलंभा दरम्यान १२.३७ किलोमीटर असे एकूण ५३.५४ किलोमीटरचे काम पूर्ण होऊ शकले. ही माहिती आज ग्राहक सल्लागार समितीच्या बैठकीत समोर आली.

यावेळी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नागपूर स्थानकावर प्रवाशांसाठी मोबाईल ॲप आधारित व्हिल चेअर उपलब्ध करण्यात आली आहे. नागूपर रेल्वे स्थानक परिसरात खासगी कंपनीमार्फत रेस्टारन्ट ऑन व्हिल सुरू झाले आहे. अजनी स्थानकावर दोन फिरते जीने आणि एक उदवाहक (लिफ्ट) बसवण्यात आले आहे.

अजनी, काटोल, वर्धा, सेवाग्राम, आमला, मुलताई, परासिया, जुन्नारदेव स्थानकावर फलाटाला छत करण्यात येणार आहे आणि त्यांचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. पीपीपी मॉडलनुसार बुटीबोरी येथे मालधक्का तयार करण्यात आला आहे. वर्धा स्थानकावर चार उदवाहक आणि एक पादचारी उड्डाण पूल प्रस्तावित आहे. यावेळी समितीचे सदस्य डॉ. कुश झूनझुनवाला, रामअवतार तोतला, पीयूष तिवारी बैतूल, सीताराम महाते, प्रदीप बजाज, ब्रजभूषण शुक्ला, लीलाधर मडावी, डॉ. कपिल डी. चंद्रयान, सुरेश भराडे, सत्येंद्र सिंह ठाकूर, मिलिंद देशपांडे, दीपक सलूजा उपस्थित होते.