चंद्रपूर शहरातील ८५ वर्षीय जलयोग साधक कृष्णराव नागपुरे यांनी रविवार २८ ऑगस्ट रोजी एका विक्रमाला गवसणी घातली. जलतरण तलावात ३७ प्रकारचे योग प्रकार एका तासाच्या कालावधीत करून दाखवले. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. त्यांच्या या अनोख्या विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चंद्रपूरमधील ८५ वर्षीय जलयोग साधक कृष्णराव नागपुरे यांचे नाव आज ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’साठी नोंदवले गेले. यावर्षी २१ जून या जागतिक योग दिवसानिमित्त त्यांनी जलतरण तलावात पाण्यातील योगाचे विविध प्रकार इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत पोचले होते, या आधारावर त्यांच्या पाण्यातील योगासनाबद्दल नोंद करण्यासाठी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ची चमू चंद्रपूरला पोचली. या चमूत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे निर्णायक न्यायाधीश डॉ. मनोज तत्त्ववादी यांचा समावेश होता. रविवारी सकाळी दहा वाजता कृष्णराव नागपुरे यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात २४ प्रकारचे योग प्रात्यक्षिके करून दाखवली, याशिवाय १३ प्रकारचे पाण्यातील विविध पोहण्याचे प्रकार करून दाखवले. अशाप्रकारे एकूण ३७ प्रकारचे योग प्रकार त्यांनी एक तासाच्या कालावधीत पाण्यात उपस्थितांसमोर करून दाखवले. यासाठी त्यांनी ऐंशी वर्षांच्या पुढील लोकांच्या पाण्यातील योगाच्या सर्वात जास्त कवायती यासंदर्भात त्यांचे नाव ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवले गेले.

या प्रकारचा प्रयत्न भारतात यापूर्वी झालेला नाही –

डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी सांगितले, की या प्रकारचा प्रयत्न भारतात यापूर्वी झालेला नाही. तत्पूर्वी कृष्णराव नागपुरे यांची प्रकृती हे योग प्रकार करण्यासाठी तंदुरुस्त आहे अशा प्रकारची कबुली डॉक्टरांनी दिली आणि यानंतर आमदार किशोर जोरगेवार, नगरसेवक पप्पू देशमुख, माजी नगरसेविका सुनीता लोढिया, ज्येष्ठ नागरिक विजय चंदावार, महापारेषण अधीक्षक अभियंता प्रफुल अवघड, समशेर बहादूर समन्वयक जिल्हा नेहरू केंद्र, डॉक्टर अजय कांबळे, चंद्रपुरातील पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक सुरेश चोपणे आणि डॉ. योगेश दूधपचारे, माजी नगरसेवक बंडू हजारे, जलतरण केंद्रातील प्रशिक्षक नीळकंठ चौधरी तसेच अनेक गणमान्य नागरिक यांच्या उपस्थितीत कृष्णराव नागपुरे गुरुजी यांनी योगाची ३७ प्रात्यक्षिके करून दाखवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’तर्फे पदक प्रमाणपत्र देऊन गौरव –

यानंतर एका कार्यक्रमात कृष्णराव नागपुरे गुरुजी यांचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’तर्फे पदक प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्रीहरी शेंडे यांनी केले, आभार सुवर्णा नागपुरे यांनी मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.