चंद्रपूर : जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणाआढळल्याा आहेत. इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांच्या संशोधनपूर्वक क्षेत्रीय पाहणीत इथे तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रे (Petroglyphs) आढळून आली आहेत. ही चित्रे उघड्या खडकाळ उंचवट्यावर रेखाटलेली असून, त्यांचा संबंध आदिमानवाच्या जीवनशैलीशी असण्याची दाट शक्यता आहे.
यामध्ये रेषात्मक आकृती, प्राण्यांचे, मानवाकृतींचे आणि धार्मिक प्रतिकांचे स्वरूप पाहता या स्थळाचे पुरातत्त्वीय मूल्य अत्यंत मोठे आहे. विशेष म्हणजे, या दुर्मीळ चित्रांपैकी एक दगड स्थानिक लोकांनी देवस्थान मानून शेंदूर लावून पूजेसाठी राखलेला आहे; मात्र या संपूर्ण स्थळाचा ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून आजवर गांभीर्याने विचार झालेला नाही.
विदर्भात विशेषतः गोंड आणि कोरकू आदिवासी जमातींची परंपरा आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या सांस्कृतिक सवयींमध्ये निसर्ग, खडक, वृक्ष यांची उपासना महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे या कोरीव चित्रांचा संबंध पूर्व-इतिहासातील आदिवासी प्रतीकात्मक संवाद प्रणालीशी असण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारच्या खडककलेची तुलना रत्नागिरी (कोंकण) मधील पेट्रोग्लिफ्स किंवा मध्य भारतातील भीमबेटका येथील भित्तिचित्रांशी करता येते. काही विद्वानांच्या मते, हे चित्रण सुमारे ४,००० ते १०,००० वर्षे जुने असू शकते, विशेषतः जर ते नवपाषाण किंवा मध्यपाषाण काळातले असतील.
झगडकर सांगतात, “हे चित्रफलक केवळ आद्य मानवाची कला नव्हे, तर त्याची अभिव्यक्ती, जीवनशैली आणि श्रद्धांचे प्रतिबिंब आहेत. महाराष्ट्रात अशा खडककला केवळ रत्नागिरी व भीमबेटका परिसरातच आढळतात. त्यामुळे वढोलीतील हा शोध फारच दुर्मीळ व अभ्यासासाठी मौल्यवान आहे.” या महत्त्वपूर्ण शोधाची दखल घेत झगडकर यांनी शासन आणि पुरातत्त्व खात्याकडे संवर्धन व संरक्षणाची मागणी केली आहे. लवकरच एक सविस्तर संशोधन अहवाल संबंधित विभागांकडे सादर केला जाणार आहे.