चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे माजी नगरसेवक, बाजार समिती संचालक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षांत प्रवेश केला आहे. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा बालेकिल्ला असलेल्या भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघात आता काँग्रेस पक्षाची स्थिती खिळखिळी झाली आहे.
भद्रावती नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडे उमेदवार उरलेला नाही, इतकी वाईट अवस्था आता पक्षाची झाली आहे. एकापाठोपाठ एक निष्ठावंतांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे हा खासदार धानोरकर यांच्यासाठी चिंता आणि चिंतनाचा विषय ठरला आहे.
खासदार धानोरकर यांचे भासरे भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या सात माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी ठाकरे सेनेचे मुकेश जीवतोडे यांनी काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांन सोबत घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. एक महिन्यापूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे रवींद्र शिंदे चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले.
आता शिंदे यांनी काँग्रेसच्या बाजार समिती संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. त्यातीलच राजेंद्र डोंगे यांची बाजार समिती सभापतीपदी वर्णी लागली. आता माजी नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, त्यानंतर बाजार समितीच्या संचालक मंडळानेही काँग्रेसला रामराम ठोकला. या पक्षांतरामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारच शिल्लक राहिलेला नाही. या निवडणुकीला काँग्रेस पक्ष कसा सामोरे जाणार, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
हक्काचा कार्यकर्ताही शिल्लक नाही
खासदार धानोरकर यांचे दिवंगत पती बाळू धानोरकर यांनी भद्रावती नगर परिषदेत एकहात्ती सत्ता काबीज करून राजकारणाची सुरुवात केली होती. मात्र, आज काँग्रेसची चांगलीच वाताहत झाली आहे. बंधू प्रवीण काकडे यांच्या सल्ल्याने राजकारण करणाऱ्या खासदार धानोरकर यांना भद्रावती शहरात हक्काचा म्हणावा असा काँग्रेसचा एकही कार्यकर्ता शिल्लक राहिलेला नाही.