चंद्रपूर: भद्रावती तालुक्यातील मौजा नंदोरी (बु.) व विसलोन येथे परवानगी पेक्षा २ लाख ब्रासहून अधिक मुरूम काढणाऱ्या पुणे येथील सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला १०० कोटींचा दंड ठोठावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भद्रावती तहसीलदारांनी कंपनीवर ही दंडात्मक कारवाई केली आहे.

पुणे येथील सोनाई इन्फास्ट्रक्चर प्रा.ली. या कंपनीला बल्लारशा ते वर्धा या नव्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या भर भराईचे काम मिळाले आहे. या कंपनीने खुराणा नावाच्या ठेकेदाराला हे काम दिले आहे. नंदोरी बु. व विसलोन या भागातील शेतांमधून ८ हजार ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी दिली असताना प्रत्यक्षात दोन लाखांचे वर ब्रास मुरमाचे उत्खनन केले आहे. यात जवळपास शासनाचा ५०० कोटी रुपयांच्या महसुल बुडाला आहे असा आरोप तकरी संरक्षण समिती अध्यक्ष विठ्ठलराव बदखल यांनी पत्रपरिषदेत केला.

दरम्यान शेतकऱ्यांच्या आरोपापूर्वीच भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.या कंपनीला १०० कोटी ४२ लाख ९९ हजार २०० रूपयाचा दंड ठोठावला असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली. मौजा नंदोरी बु. येथील शेत जमीनीमधुन सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली या कंपनीने अवैध उत्खनन केल्याची तक्रार मिळताच तलाठी यांनी मौका चौकशी व पंचनामा केला. मौका पंचनाम्यावरून संदर कपंनीने अवैध उत्खनन केल्याची बाब समोर आली. त्यानुसार अवैध उत्खननाबाबत तांत्रीक तपासणी करीता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भद्रावती यांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. भद्रावती येथील बांधकाम विभागाने अवैध मुरुम संदर्भात तांत्रीक तपासणी करून अहवाल सादर केला.

यामध्ये अवैध उत्खनन झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मौजा नंदोरी बु. येथील सर्वे क्रमांक ५९०/२ व ५९०/३ या शेतजमीनीवरील अवैध मुरुम उत्खननाबाबत ३६ कोटी ६ लाख ४६ हजार दंड केला आहे. तर मौजा विसलोन येथील स.क्र १२९ या शेतजमीनीवरील अवैध मुरुम उत्खनाबाबत २२ कोटी ३१ लाख ७२ हजार ४०० रूपये दंड केला आहे. मौजा नंदोरी बु. येथील स.क्र ५८३/१/अ या शेतजमीनीवरील अवैध मुरुम उत्खननाबाबत ३१ कोटी ६६ लाख २२ हजाराचा दंड ठोठावला आहे. तर मौजा नंदोरी बु. येथील स.क्र ५८४ या शेतजमीनीवरील अवैध मुरुम उत्खनननाबाबत १० कोटी ३८ लाख ५८ हजार ८०० रूपये इतका दंड आकरण्यात आलेला आहे. सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला एकूण १०० कोटी ४२ लाख ९९ हजार २०० रूपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती भद्रावती तहसीलदार यांनी दिली.