चंद्रपूर: बनावट दारूपाठोपाठ जिल्ह्यात ब्राऊन शुगर, एमडी, गांजा तसेच इतर अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरूणाई, महाविद्यालयीन विद्यार्थी अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढले जात आहेत. पोलीस दलाने अवघ्या सात महिन्यात अंमली पदार्थ प्रकरणी १२५ गुन्हे नोंदवले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची वाटचाल ‘उडता पंजाब’च्या दिशेने सुरू झाली आहे. पोलिसांनी वेळीच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर भविष्यातील चित्र अतिशय वाईट असेल, अशी भीती पालकांना सतावत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारू विक्री व तस्करी होत आहे. गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातील दारू तस्कर बनावट दारूच्या व्यवसायात सक्रिय आहेत. बल्लारपुरातील श्रवण व पवन जयस्वाल या व्यवसायातील ‘किंग’ आहेत. पैशाच्या बळावर बनावट दारू विक्री करून लोकांच्या आयुष्याशी खेळ करत आहेत. राजकारणी व अधिकाऱ्यांचा या दोन्ही तस्कर भावांना आशीर्वाद आहे.
बनावट दारू पाठोपाठ आता जिल्ह्यात अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आयात होत आहेत. पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार, सात महिन्यात १२५ गुन्हे अंमली पदार्थ विक्री प्रकरणी दाखल झाले आहेत. याचाच अर्थ जिल्ह्यात महिन्याकाही कोट्यावधीची ब्राऊन शुगर, चरस, गांजा व एमडी असे अंमली पदार्थ आयात होत आहेत. या व्यवसायात देखील शहरातील काही युवक सक्रिय आहेत. शाळा, महाविद्यालय परिसरात श्रीमंत लोकांच्या मुलांना गाठून त्यांना अंमली पदार्थांच्या नशेची सवय लावली जात आहे. शहरात अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी काही अड्डे आहेत. तिथे रात्रीच्या अंधारात तरूणाई, विद्यार्थी या नशेत धुंद असतात.
महाविद्यालयीन परिसरासोबतच शहरातील मोकळी मैदाने, अंधाराचा परिसर, उड्डाणपुल येथे हा धंदा रात्रीच्या अंधारात उघडपणे सुरू आहे. शहरातील डॉक्टरांकडेही अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या अनेक तरूणांची प्रकरणे येत आहेत. अंमली पदार्थाचा हा काळा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की पालक वर्ग चिंतेत पडला आहे. यामुळे अंमली पदार्थ विरोधी मोहिम हाती घेण्याची आवश्यकता अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. नागपुर मार्गे चंद्रपूरात अंमली पदार्थ येत असल्याने या सर्व मार्गावर तसेच इतरही छुप्या मार्गावर लक्ष देण्याची गरज आहे.
पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधी मार्च
चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विळख्याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधीकारी सुधाकर यादव यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाने मुख्य मार्गाने भव्य रूटमार्च काढला. आजच्या पिढीला व्यसनाचे दुष्परिणाम आणि अंमली पदार्थाचे वापरामुळे होणारे नुकसान याची जाणीव करुन देत, पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचा संदेश दिला. तसेच अमली पदार्थाचे सेवन, विक्री, बाळगणे बाबत माहिती असल्यास किंवा शंका असल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा पोलीस नियंत्रण कक्षाचे ११२ यावर कॉल करुन माहिती देवुन चंद्रपूर जिल्हा नशा मुक्त करण्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
बनावट दारू प्रकरणातील आरोपी जयस्वाल फरारच
बल्लारपुरातील बनावट दारू प्रकरणातील आरोपी श्रवण जयस्वाल मागील एक आठवड्यापासून फरार आहे. उत्पादन शुल्क विभाग आरोपीचा शोध घेत आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रवण जयस्वाल याचा मोबाईल फोन बंद आहे. त्याचे लोकेशन ट्रेस होत नसल्यामुळे अटक करण्यात अडचण येत आहे. अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. जयस्वाल यांना राजकीय आशीर्वाद असल्याची चर्चा आहे.