नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. नागभिड तालुक्यातील आकापूर येथील वासुदेव वेटे हा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. शेतात काम करायला गेला असता वाघाने त्याच्यावर हल्ला केला.
जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष सर्वाधिक तीव्र असल्याचे समोर आले आहे. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात १७५ नागरिकांचा वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. २०२५ मधील अवघ्या सहा महिन्यांत २५ ग्रामस्थांचा बळी गेला. वाघांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आता सर्वच स्तरातून व्यक्त होवू लागली आहे. जंगलाचे क्षेत्र कमी होत चालल्याने वाघ आता गावाच्या दिशेने कूच करीत आहे. शेतीची कामे, मोहफूल व तेंदूपाने गोळा करणे, सरपण तसेच गुरे चारणे, अशा विविध कामांसाठी गावकरी जंगलात किंवा जंगलाला लागून असलेल्या शेतशिवारात जातात. तिथे त्यांचा वाघाशी सामना होतो. यात ग्रामस्थांचा नाहक बळी जातो.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. मागील काही वर्षांत जंगल क्षेत्रातही वाढ झालेली आहे. यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत चालला आहे. नागभिड तालुक्यात घडलेल्या या घटनेनंतर वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी आकापूर येथील गावकऱ्यांनी वनविभागाकडे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. पिंजरे लावून वाघाला जेरबंद करण्यात यावे. शेती व जंगलाच्या सभोवताल ताराचे कुंपण तयार करुन देण्यात यावे. तळोधी ते आकापूर, बाळापूर ते आकापूर व देवपायली ते बाळापूर रोडच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे साफ करुन देण्यात यावी. रानडुकर, चितळ, निलगायीमुळे झालेले शेतीपिकाचे नुकसान त्वरीत पंचनामे करण्यात यावे, आदी मागण्या गावकऱ्यांनी वनखात्याकडे केल्या. यावर त्वरित या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गावकऱ्यांना दिले. दरम्यान, मृताच्या कुटूंबियांना वनखात्याकडून नुकसानभरपाई देण्यात आली.
जंगलात लपून बसलेला वाघ ग्रामस्थांवर अचानक हल्ला करतो. यामुळे जंगलात जाताना ग्रामस्थांनाच वाघांपासून स्वत:चे रक्षण करावे लागणार आहे. मागील काही वर्षांपासून शेतशिवारात वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असल्यामुळे शेतमजूर शेतात यायला धजावत नाहीत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमावावा लागतो, सोबतच शेतीचे नुकसान होते. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या दहशतीत शेती कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचाही जीव धोक्यात आला आहे.
माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेची सूचना वन विभागाला दिली त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. परंतु नागरिकांचा प्रचंड रोष बघता वन विभागातील अधिकारी सुद्धा अवाक झाले नागरिकांनी मृतकाचा मृतदेह हलविण्यास नकार दिला आणि काही मागण्या वन विभागात सादर केल्या. यानंतर महिला रेंजर असलेली कर्मचारी यांनी उपस्थित नागरिकांसोबत उद्धट वर्तन केले त्यामुळे नागरिकांचा रोष आणखीनच तीव्र झाला. त्यानंतर वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने मध्यस्थी करत नागरिकांची निवेदन स्वीकार केले आणि तीन दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्या व्यतिरिक्त अनेक मागण्या त्यांनी मान्य केल्या. त्यानंतरच मृतदेह तिथून हलविण्यात आला. एकीकडे वाघांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे प्राण जात असतानाच वन विभागातील कर्मचारी शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन कसे करू शकतात हा कळीचा मुद्दा ठरला आहे.
