चंद्रपूर : शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवून शैक्षणिक देवाण-घेवाण करण्यासाठी चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी, (वन अकादमी) आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड (यूडब्ल्यूई), ब्रिस्टल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

या करारामुळे ऑनलाइन व्याख्यानांचे आदानप्रदान, संयुक्त अल्पकालीन अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळा, संशोधन सहकार्य अभ्यासक्रम मान्यता, आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या अनुषंगाने युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टल येथील इकोसिस्टम सर्व्हिसेसचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मार्क एव्हरार्ड यांनी १३ ते १५ एप्रिलदरम्यान चंद्रपूर वन अकादमीला भेट दिली. यावेळी ‘वाईल्ड लाईफ ॲन्ड वेटलॅन्ड प्रोटेक्शन फाउंडेशन’चे शिवाजी चव्हाण सोबत होते.

या भेटीचे समन्वयक म्हणून अकादमीतील प्राध्यापक एस.के. गवळी यांनी जबाबदारी पार पाडली. भेटीदरम्यान डॉ. मार्क एव्हरार्ड यांनी वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी आणि अकादमीच्या प्राध्यापकांशी सविस्तर चर्चा केली.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टल येथील प्राध्यापकांकडून चंद्रपूर वन अकादमीतील प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाइन व्याख्याने दिली जातील. तसेच चंद्रपूर वन अकादमीचे प्राध्यापक ब्रिस्टल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्याख्याने घेतील.

दोन्ही संस्थांच्या सहभागाने संयुक्तपणे अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम चंद्रपूर वन अकादमीमध्ये आयोजित करण्यात येतील. चंद्रपूर वन अकादमीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टलच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा व परिसंवाद आयोजित केले जातील. वन विभागाच्या संदर्भात महत्त्वाच्या संशोधन क्षेत्रांची ओळख पटवून,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामध्ये ब्रिस्टलच्या संशोधकांचे तांत्रिक व शैक्षणिक सहकार्य घेण्यात येईल.या करारामुळे चंद्रपूर वन अकादमीतील शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्यक्षमता वाढीस लागेल आणि प्रशिक्षणार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्ञान व अनुभव प्राप्त होण्यास मदत होईल, असे वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी म्हटल.