चंद्रपूर : जिल्ह्याचा भौगोलिक इतिहास हा मला माहिती नाही, जिल्ह्यातील अनेक विषयांचा अभ्यास नाही, अभ्यास करायला वेळ लागेल, हे उत्तर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ.अशोक उईके यांचे आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना इतिहास माहिती करून घेण्यास व अभ्यास करण्यास किती कालावधी लागणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने वन अकादमी येथे पालकमंत्री प्राचार्य डॉ.अशोक उईके यांच्या मिट द प्रेस कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री डॉ.उईके बोलत होते. खरीप हंगामाबाबत बैठकीत शेतकऱ्यांना बँकेनी कर्ज द्यावे, कृषी विभागाने खतांचे योग्य नियोजन करावे अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ करावी, लिंकिंग तसेच खत विक्रीतील काळाबाजारी यावर निर्बंध घातले जावे, असेही सांगितले. तसेच इरई नदी खोलीकरण मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार आहे, ४५ दिवसांचा हा नदी स्वच्छतेचा उपक्रम असल्याची माहिती दिली. आदिवासी विकास विभागाच्या निधीला अर्थमंत्री अजित पवार यांनी कात्री लावली व लाडकी बहीण योजनेकडे निधी वळता केला का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, आदिवासी खात्याला सर्वाधिक ९.३६ टक्के निधी महायुती सरकारने दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच वर्षासाठी निधीचे वितरण केले गेले आहे. यावर्षी थोडा कमी निधी मिळाला असला तरी येत्या मार्च पर्यंत संपूर्ण निधी मिळणार आहे. दरम्यान पालकमंत्री डॉ.उईके यांना जिल्ह्यातील विविध विषयांची माहिती व अभ्यास नसल्याची स्पष्ट कबुलीच त्यांनी दिली. झरपट नदीतून रस्ता टाकण्यात आला आहे या विषयाची माहिती त्यांना नव्हती, तसेच जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी एका क्रीडांगणाचा बळी घेतला जात आहे याचीही माहिती पालकमंत्री या नात्याने त्यांच्याकडे नव्हती, यासोबतच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बरी आहे असेही डॉ.उईके म्हणाले. भाजपात दोन आमदारांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्ष नियुक्ती रखडलेली आहे, याबाबत छेडले असता, भाजपात सर्वकाही आलबेल आहे, कुरघोडी किंवा गटबाजी नाही असेही डॉ.उईके म्हणाले. ही सर्व माहिती देताना पालकमंत्री उईके जिल्ह्याचा अभ्यास नाही, भौगोलिक इतिहासाची माहिती नाही असेही वारंवार सांगत होते. एकूणच पालकमंत्री जिल्ह्यातील विविध प्रश्न, समस्या याबाबत अद्यापही अनभिज्ञ असल्याचे यावेळी दिसून आले.