चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या वनिता जितेंद्र राऊत या महिला उमेदवाराने खासदार म्हणून निवडून आल्यावर ” गाव तिथे बियर बार ” सुरू करून बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे आश्वासन दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिला उमेदवाराने खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा केली आहे.

चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात निवडणूक रिंगणात एकूण १५ उमेदवार आहेत. यात काँग्रेस, भाजप, वंचित अश्या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. मात्र सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चर्चा आहे ती अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची. विकास कार्याचे आश्वासन घेऊन नेते जनते समोर उभे होतात. याला वनिता राऊत अपवाद ठरल्या आहेत. गाव तिथे बिअर बार उघडू. बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ, असे आश्वासन त्या देत आहेत.

हेही वाचा…काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा, मात्र अकोला लोकसभेसाठी काँग्रेसला पाठिंबा मागितलेला नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

खासदार झाले तर खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे मतदार किती आकर्षित होतात हे बघणे उस्तुकतेचे ठरणार आहे. वनिता राऊत ह्या सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावातील रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर येथून २०१९ ची लोकसभा, २०१९ मध्ये चिमूर विधानसभा निवडणुक लढवली आहे. दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यावेळी जिल्ह्यात दारुबंदी होती. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी उठवून ठिकठिकाणी दारूचे दुकाने उघडण्यात यावी अशी मागणी केली होती.

हेही वाचा…गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

गाव तिथे दारूचे दुकान असे धोरण त्यांचे आहे.समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणे ही फार मोठी चूक असल्याचे त्या म्हणतात. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा दारुसाठी प्रसिद्ध आहे. बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी ही महिला उमेदवार थेट बिअर बारचा परवाना देणार आहे, असे आश्वासन देत फिरत असल्याने मतदारांमध्ये या महिला उमेदवाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.