चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील देखभाल व दुरुस्तीची कामे ई-निविदा प्रणालीद्वारे खरेदी प्रक्रिया, महानिर्मिती कंपनीचे खरेदी धोरण व राज्य शासनाच्या खरेदी नियमांचे पालन करून, स्पर्धात्मक व पारदर्शक पद्धतीने कंत्राटे काढली जातात. कुठल्याही दबावाखाली येऊन कोणतेही कंत्राट कुठल्याही कंत्राटदारास दिल्या जात नाही, असा दावा चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी केला.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची सद्यस्थितीत २९२० मेगावॉट स्थापित क्षमता आहे. केंद्रातील सर्वच कामे ही महानिर्मितीच्या धोरणानुसार होतात. निविदा प्रक्रियेत नोंदणीकृत पुरवठादार, कंत्राटदार हे पात्रता निकषांमध्ये समाविष्ट अटींनुसार निविदेत सहभागी होतात.

तांत्रिक निविदा उघडल्यानंतर ज्या पुरवठादार, कंत्राटदाराने पात्रता निकषांप्रमाणे निर्देशित अटींची पूर्तता केलेली असेल त्यांचेच दरपत्रक उघडले जाते आणि कमीत कमी दराने पुरवठा, काम करणाऱ्या पुरवठादार, कंत्राटदारास कार्यादेश पारित करण्यात येतो. कुठल्याही दबावाखाली येऊन कोणतेही कंत्राट कुठल्याही कंत्राटदारास दिल्या जात नाही.

सर्व ई-निविदा अटी व शर्तीच्या अधिन राहून पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येतात. त्यामुळे, ‘नागपुरातील मंत्र्यांच्या भावाच्या हस्तक्षेपामुळे कंत्राटदार त्रस्त, कंत्राटासाठी दबंगशाही,’ असे काहीही नाही. पूर्वी कार्यादेश घेण्याकरिता कंत्राटदारांना कार्यालयात यावे लागायचे. आता ‘डिजिटलायझेशन’चा एक भाग म्हणून तसेच कंत्राटदारांची होणारी गैरसोय व अनावश्यक विलंब टाळण्याकरिता सदर कार्यादेश हे ‘ई-मेल’द्वारे, टपालाद्वारे कंत्राटदारास पाठवण्यात येतात.

छोट्या कंत्राटदारांना मुख्य अभियंता यांचे कार्यालयात कुठल्याही प्रकारची प्रवेशबंदी नाही. कुठल्याही कारणांसाठी तसेच कुणालाही मनाई अथवा बंदी नाही. छोटे-मोठे कंत्राटदार असो वा कामगार, ज्यांना काही तक्रारी, समस्या असतील त्यांना भेटण्याची रितसर परवानगी देण्यात येते व त्यामध्ये कोणताही भेदभाव केल्या जात नाही, अशीही माहिती राठोड यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन आठवड्यात ५०० मेगावॉटचा ९ वा संच सुरू होणार

मागील अनेक दिवसांपासून वीज केंद्रातील ५०० मेगावॉट क्षमतेचा ९ व्या क्रमांकाचा संच तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. या संचाच्या दुरूस्तीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या दोन आठवड्यात हा संच पूर्ववत कार्यान्वित होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता राठोड यांनी दिली. पावसाळ्यात वीज केंद्राल कोळशाची अडचण जाणवते. ओला कोळसा वीज निर्मितीत अनेक अडचणी निर्माण करतात. मात्र यावर्षी कोळशाची कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.