चंद्रपूर : नगरपालिका निवडणुकीत उतरलेल्या काही उमेदवारांना नामांकन पत्रातील त्रुटींचा फटका बसला. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यात सर्वात मोठा धक्का नागभीड नगर पालिकेत वंचित बहुजन आघाडीला बसला. सूचकांची संख्या अपुरी असल्याने वंचितचे अध्यक्षपदाचे उमेदवार चंदन कोसे यांच्यासह सहा नगरसेवकांचे अर्ज फेटाळण्यात आले. घुग्घुसमध्ये शिवसेना (उबाठा) गटाच्या शोभा ठाकरे यांचा, तर वरोऱ्यात मनीषा विलास नेरकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज त्रुटीमुळे बाद करण्यात आला.

जिल्ह्यातील दहा नगर पालिका आणि एका नगर पंचायतमधील नगरसेवकांच्या २५३ जागांसाठी शेवटच्या दिवशी (सोमवार) एकूण १,५४५ नामांकन दाखल झाले. नगराध्यक्ष पदाच्या ११ जागांसाठी १२१ दावेदार रिंगणात उतरले होते. आज झालेल्या छाननीत नागभीडमध्ये वंचित उमेदवारांच्या अर्जावर सूचकांची संख्या अपुरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांचे अर्ज बाद झाले. प्रभाग क्र. ९ मधील अपक्ष मनीषा मानापुरे यांचेही नामांकन रद्द झाले. वंचित आघाडीने या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे.

भिसी नगर पंचायतीत अपक्ष उमेदवार विक्की कटारे, मनोज गेंगणे, हनुमान गेडाम आणि संजय खोब्रागडे यांचे नगराध्यक्ष पदाचे अर्ज फेटाळण्यात आले. येथे नगराध्यक्ष पदासाठी एकूण अकरा उमेदवार होते. गडचांदूरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या अकरा अर्जांपैकी एक अर्ज बाद झाला. शिवसेना (शिंदे गट) चे धनंजय छाजेड आणि उद्धव पुरी यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी उद्धव पुरी यांचा अर्ज एबी फॉर्म नसल्यामुळे रद्द झाला. ब्रह्मपुरीत भाजपचे अरविंद नंदूरकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज खल केला होता; परंतु एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. आता प्रा. बाळबुध्दे हे भाजपचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत.

वरोरा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी एकूण ९ नामांकन दाखल झाले होते. त्यापैकी दोन नामांकन अपात्र ठरले. नगरसेवक पदासाठी आलेल्या १७१ अर्जांपैकी १३ अर्ज रद्द झाले. आता नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी १५८ उमेदवार रिंगणात आहेत.

एकाच प्रभागात भाजपचे दोन एबी फाॅर्म दिल्याने वाद न्यायालयात

बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचे वितरण झाले. प्रभाग ९ मध्ये माजी नगरसेवक व्यंकटेश बालबहीरय्या यांना स्थानिक पातळीवरून एबी फॉर्म देण्यात आला, तर त्याच प्रभागातील माजी नगरसेवक नासिर खान यांनी प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म घेतला.

एकाच प्रभागासाठी एकाच पक्षाचे दोन एबी फॉर्म आल्याने मोठा पेच निर्माण झाला. त्यामुळे छाननीत विलंब झाला. दोन्ही उमेदवारांच्या वकिलांनी आपापली बाजू निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडली. अखेरीस अधिकाऱ्यांनी या दोघांनाही ३ दिवसांत हायकोर्टातून निर्णय आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.