चंद्रपूर: आमदार किशोर जोरगेवार यांनी मित्राच्या बंगल्यासाठी एका नाल्यात बांधलेल्या ९५ लाखाच्या भिंतीची नागपूरच्या मृद व जलसंधारण विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रक विभागाने चौकशी सुरू केली आहे. या दक्षता पथकाचे प्रमुख कार्यकारी अभियंता अनंत जगताप यांनी सोमवार २३ जून रोजी चंद्रपुरात येवून नाल्यातील भिंतीची पाहणी केली. दरम्यान यावेळी भिंतीसाठी नाल्याचे पात्र कमी केले अशीही तक्रार स्थानिकांनी जगताप यांच्याकडे केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशीकरून शासनाकडे अहवाल सादर केला जाणार आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे सराफा व्यवसायी व मद्य वितरण कंपनीच्या संचालक मित्राच्या ‘हवेली गार्डन’ मार्गावरील प्रशस्त निवासस्थानालगतच्या नाल्यावर बांधलेल्या संरक्षण भिंतीसाठी ९५ लाखाच्या शासकीय निधीचा गैरवापर केला अशी तक्रार आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी केली आहे. तसेच नाल्यातील या भिंतीमुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेची परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्र न घेता ही भिंत बांधण्यात आली आहे.
दरम्यान आपच्या तक्रारीनंतर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही या भागातील लोकांनी पुराचा धोका संभवतो अशी तक्रार केल्यानंतर या भिंत बांधकामात शासकीय निधीचा गैरवापर झाल्याची तक्रार खरी आहे का? पूरग्रस्त भागात संरक्षण भिंत का नाही? या प्रकरणाची चौकशी झाली का? कारवाई काय? कारवाई न झाल्यास विलंबाची कारणे काय, असे तारांकित प्रश्न आगामी विधिमंडळ अधिवेशन कामकाजात उपस्थित केले आहे. त्यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने माहिती मागवली असून, जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान या भिंतीच्या तक्रारी बघता नागपूरच्या मृद व जलसंधारण विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रक विभागानेही याची चौकशी सुरू केली आहे. दक्षता पथकाचे प्रमुख अभियंता अनंत जगताप यांनी सोमवारी चंद्रपुरात येवून वडगाव प्रभागातील या भिंतीची पाहणी केली. यावेळी त्यांचे सोबत मृद व जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता निलिमा मंडपे, डेप्टी अभियंता मोहण बल्की व इतर अधिकारी उपस्थित होते.
भिंतीची पाहणी करित असतानाच या भागातील स्थानिक नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनीही नाल्याचे पात्र कमी करून भिंत बांधल्याची तक्रार दिली. यासंदर्भात अधिक माहितीसाठी अनंत जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, प्रत्यक्ष घटनास्थळी जावून भिंतीची पाहण केल्याची माहिती दिली. भिंतीसंदर्भात आजही तक्रारी प्राप्त झालेल्याा आहेत. त्यामुळे संपूर्ण चौकशीअंती अहवाल तयार करून राज्य सरकारकडे सादर करणार असल्याची माहिती दिली.