चंद्रपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे याच्या इंदिरा नगर येथील निवासस्थानी रामनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सहारे याच्या घरातून ४० जिवंत काडतुसे, तलवार, वाघनख जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. यावरून पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रचंड टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रांत सहारे असे आरोपीचे नाव आहे. ही कार्यवाही शुक्रवारी मध्यरात्री रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी केली. जुलै महिन्यात चंद्रपुरात गोळीबाराच्या घटनांनी थरार उडाला आहे. गोळीबारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे भयावह चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कंबरेला देशीकट्टा लावून फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली होती. गुन्हेगारांकडे सापडणाऱ्या शस्त्रसाठ्यामुळे शहरवासी भयभीत झाले आहेत.

हेही वाचा…गडचिरोली : फेरफारसाठी शेतकऱ्याकडे पैश्यांची मागणी; लाचखोर मंडळाधिकारी, तलाठी अटकेत

प्राप्त माहितीनुसार, शहरातील बाबूपेठ येथील निलेश पराते, मनोज कुलटवार हे दोघे इंदिरा नगरातील विक्रांत सहारे यांला शस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. या माहितीचा आधारावर पोलिसांनी सापळा रचला. दोघे घरी पोहताच पोलिसांनी छापा घातला. घरातून चाळीस जिवंत काडतूस,तलवार सापडली. वाहनाची तपासणी केली असता त्यात वाघनख सापडले. पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले आहे. विक्रांत सहारे हे युवासेनेचे उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत. सहारे यांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील अनेक राजकारणी शास्त्र बाळगत असल्याने येत्या काळात पोलिस विभागाच्या रडारवर त्यांची नावे देखील आहेत.

हेही वाचा…महिलांनो सावधान! मुनगंटीवार म्हणतात, “लाडकी बहीण योजनेसाठी मविआचे नेते चुकीचे अर्ज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुलै महिन्यात मनसे कामगार सेना प्रमुख अमन अंधेवार यांच्यावर रघुवंशी संकुलात गोळीबार झाला होता. या गोळीबारात अंधेवार गंभीर जखमी आले होते. त्यानंतर बल्लारपूर शहरात कापड व्यवसायी अभिषेक मालू यांच्या दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला होते. तेव्हा मालू यांना धमकवण्यासाठी बंदुकीचा वापर केला गेला. तर राजुरा येथे गोळीबारात सिंह यांची हत्या करण्यात आली. दरम्यान या सर्व घटना बघता जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बंदूक, देशीकट्टा, तलवार वापरणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू केली आहे. याच कारवाईतून आतापर्यंत २२ गुन्हेगारांवर हद्दपरीची कारवाई केली आहे. येत्या काळात ही कारवाई आणखी तीव्र होणार आहे.