चंद्रपूर : आय.आय. टी. रुडकी येथून बी. टेक झालेला आणि बंगळुरू येथील खासगी कंपनीत कर्तव्यावर असलेल्या चंद्रपूरचा सुपूत्र प्रणय जितेंद्र जनबंधू याने एअर इंडियात फ्लाइंग ऑफिसर या पदासाठी पात्रता मिळवली आहे. प्रणय फ्लाइंग ऑफिसर झाल्याने सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रणय जनबंधू याने आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर भारतीय वायुसेनेत स्थान मिळवले आहे. त्याची फ्लाइंग ऑफिसर या मानाच्या पदासाठी निवड झाली आहे. त्यांच्या रुपाने चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रणय जनबंधू हा चंद्रपूर शहरातील पडोली परिसरातील साई रेसिडेन्सी येथील रहिवासी आहे. त्याचे वडील जितेंद्र जनबंधू आणि आई नीता जनबंधू हेही समाजसेवेत सक्रिय आहेत. प्रणय याचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट मेरी हायस्कूल दुर्गापूर येथे झाले. बारावीचे शिक्षण आयआयटी होम नागपूर येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांने आयआयटी रुडकी (उत्तराखंड) येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेकची पदवी प्राप्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंगळुरू येथील खासगी कंपनीत नोकरी करत असतानाच प्रणयने भारतीय वायुसेनेच्या एएफसीएटी (एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट) या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन केले. प्रणयची ही कामगिरी केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. एएफसीएटी परीक्षेत त्याने २ एएफएसबी मैसूर या निवड मंडळातून सहभागी होत ऑल इंडिया रँकिंगमध्ये एअर – ७९ प्राप्त करत फ्लाइंग ऑफिसर या पदासाठी पात्रता मिळवली. कोणतेही कोचिंग न घेता, केवळ स्वतःच्या प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश आहे. त्याच्या या यशाची दखल घेत सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.