चंद्रपूर : मूल तहसील कार्यालयासमोर रितिक शेंडे (२८) या युवकाची शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार युवकांनी हत्या केली. शहरात तीन महिन्यातील ही दुसरी हत्येची घटना आहे. शुक्रवारी रात्री मूल पोलीस ठाण्यात नागरिकांनी एकत्र येत आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली. शनिवारी शवविच्छेदनानंतर संतप्त नागरिकांनी मूल तहसील आणि पंचायत समितीजवळील घटनास्थळी मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन केले. यामुळे चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वाहतूक खोळंबली. दरम्यान, शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी आरोपी राहुल पासवान याच्यासह तीन आरोपींना अटक केली आहे, तर अन्य फरार आहेत.

मूल तहसील कार्यालयासमोर नगर पालिकेने उभारलेल्या बस थांब्यात रात्री दहा वाजताच्या सुमारास रितिक बसून होता. तीन-चार युवक तेथे आले आणि त्याच्याशी वाद घातला. या वादाचे पर्यावसण हाणामारीत झाले. आरोपींनी चाकूने वार करून रितिकला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रितिक आरडाओरड करित होता. त्याच वेळी काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतले. मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. कुटुंबीय, समाज बांधव, नागरिकांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात गर्दी केली. शनिवारी सकाळपासूनच उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक नागरिकांची आणि कुंटुंबीयाची गर्दी झाली होती. आरोपींना अटक करा, अशी मागणी जमावाने केली. रितिकची हत्या कोणत्या कारणासाठी झाली, याचा अद्याप उलगडा होवू शकला नाही. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा…बीड, परभणीत रस्‍त्‍यावर गुंडागर्दी आणि खाकीतील… बच्चू कडूंनी थेटच…

कडकडीत बंद

रितिक शेंडे हत्येच्या निषेधार्थ मूलमध्ये शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठ शंभर टक्के बंद होती. मूलमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, चरस, गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री आणि सेवन केल्या जात आहे. अवैध धंद्यांत वाढ झाली आहे. यातूनच गुन्हेगारी वाढल्याचे बोलले जाते. स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. मूलमध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय आणि गांधी चौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. तीन महिन्यांपूर्वी मूलमध्ये प्रेमचरण कांबळे या युवकाची अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती, तर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींना अटक

मूल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल सत्तन पासवान (२०) व त्याचे सहकारी अजय दिलीप गोटेफोडे (२२) व एका अल्पवयीन आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर शहरातून अटक केली आहे.