चंद्रपूर : डॉमिनोजमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य युवकाला आयकर विभागाने चक्क १५ कोटी ४८ लाख रुपये भरण्यासाठी नोटीस जारी केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात धाबा गावातील रहिवासी दिवाकर कुकुडकर याचे पाच वर्षांपूर्वी शैक्षणिक दस्तावेज हरवले. याची त्याने पोलिसांत तक्रारही केली. त्यानंतर तो गुजरातला भावनगर येथे कामाच्या शोधात गेला. तिथे त्याला KFC, PIZZA HUT यासारख्या शोरुममध्ये काम मिळाले. त्यानंतर मागील वर्षी तो यवतमाळ इथे आला. डॉमिनोजच्या एका शॉपमध्ये तो काम करू लागला.
सगळे सुरळीत असताना मागील मार्च महिन्यात त्याला आयकर विभागाची नोटीस मिळाली. प्रारंभी त्याला सुचलेच नाही. पण जाणकारांकडून माहिती घेतली, तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने आयकर विभागात जाऊन वास्तविकता सांगितली. पण सकारात्मक उत्तर मिळाले नाही. दिवाकरच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी दाखवण्यात आली असून, GST नोंदणी पण करण्यात आल्याची माहिती त्याला इथे मिळाली.
यामुळे चक्रावून गेलेल्या दिवाकरने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावर आता काय निर्णय होतो, आयकर विभाग काय भूमिका घेते आणि खरेच दिवाकर निरागस आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे बाकी आहेत. पण आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दिवाकरचे श्रम, पैसे आणि वेळ वाया जात आहे.