चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष सर्वाधिक तीव्र असल्याचे समोर आले आहे.मागील पाच वर्षांत जिल्ह्यात १७५ नागरिकांचा वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. २०२५ मधील अवघ्या सहा महिन्यांत २५ ग्रामस्थांचा बळी गेला. वाघांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आता सर्वच स्तरातून व्यक्त होवू लागली आहे.
देशात ५८ व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यात ३,६८२ वाघ आहेत. त्यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २४८ वाघ आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी होत चालल्याने वाघ आता गावाच्या दिशेने कूच करीत आहे. शेतीची कामे, मोहफूल व तेंदूपाने गोळा करणे, सरपण तसेच गुरे चारणे, अशा विविध कामांसाठी गावकरी जंगलात किंवा जंगलाला लागून असलेल्या शेतशिवारात जातात. तिथे त्यांचा वाघाशी सामना होतो. यात ग्रामस्थांचा नाहक बळी जातो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. मागील काही वर्षांत जंगल क्षेत्रातही वाढ झालेली आहे. यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत चालला आहे.
जंगलात लपून बसलेला वाघ ग्रामस्थांवर अचानक हल्ला करतो. यामुळे जंगलात जाताना ग्रामस्थांनाच वाघांपासून स्वत:चे रक्षण करावे लागणार आहे. मागील काही वर्षांपासून शेतशिवारात वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असल्यामुळे शेतमजूर शेतात यायला धजावत नाहीत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमावावा लागतो, सोबतच शेतीचे नुकसान होते. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या दहशतीत शेती कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचाही जीव धोक्यात आला आहे.
मागील पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यांत १५० जणांना, बिबट्यांच्या हल्यांत १७, रानडुकरांच्या हल्ल्यांत ४, तर हत्तींमुळे एकाला आपला जीव गमवावा लागला. ब्रह्मपुरी वन विभागातील नागरिक सर्वाधिक बळी ठरले. पाठोपाठ चंद्रपूर, ताडोबा अंधारीनंतर मध्य चांदा विभागात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेले आहेत.
वर्षनिहाय मृत्यूसंख्या
२०२१ – ४३
२०२२ – ५१
२०२३ – २५
२०२४ – ३१
२०२५ – २५