नागपूरमध्ये प्रदेश काँग्रेस कार्यकार्यणीच्या बैठकीत बोलताना नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असा दावा केला होता. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोचक टोला लगावला आहे. पटोलेंचा हा दावा म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
“काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडून येत असेल, तर त्यांचे अभिनंदन आहे. त्यांनी स्वबळावर लढावं आणि सत्तेत येऊन दाखवावं. २०२४ मध्ये सत्तेत कोण येईल? हे जनताच ठरवेल. त्यांचे हे विधान म्हणजे उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे”, असा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. “नाना पटोले यांनी सद्या काँग्रेसची जी वाताहत होते आहे, त्याकडे लक्ष द्यावं. ‘भारत जोडो’ यात्रा ज्या भागातून केली, त्याच भागात रोज काँग्रेस कायकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. काँग्रेसमध्ये नेत्यांना वाटतं की आपण असुक्षित आहोत. अशा परिस्थिती नाना पेटोले सत्तेत येण्याची स्वप्र कोणत्या आधारावर बघत आहेत, याबाबत कल्पना नाही”, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, शिक्षक मतदारसंघाच्या जागा वाटपावरून शिंदे गटाबरोबर कोणतेही मतभेद नाही, अशी प्रतिक्रिया दिली. “ ”या निवडणुकांसाठी भाजपा-शिंदे गटाची युती झाली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून उमेदवार दिले आहेत. यासाठी कोणतेही मतभेद नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Hasan Mushrif ED Raid: सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”
नाना पटोले नेमकं काय म्हणाले होते?
नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असा दावा केला होता. “शरद पवार यांनी १९९९ साली काँग्रेसमधून बाहेर पडत नवीन पक्ष स्थापन केला. पण, काँग्रेस पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार पुण्यातील कार्यालयात गेले होते. तेव्हा शरद पवार यांनी सांगितलं की, काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही. काँग्रेसला संपवायला अनेकजण निघाले होते. ती संपली तरच आपण जिवंत राहू ही कुरघोडी सातत्याने चालते. पण, त्यांनाही मान्य करावं लागलं, काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे. राहुल गांधींच्या यात्रेनंतर लोकांचं समर्थन पुन्हा काँग्रेसला मिळत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करून शकते, अशी परिस्थिती आहे.”, असे ते म्हणाले होते.
