अमरावती : उद्धव ठाकरे हे सध्या विरोधी पक्षात आहेत. त्यांना सध्या महाराष्ट्रात फिरू द्या. आम्ही सरकार म्हणून आमचे काम करीत आहोत. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना ते मंत्रालयात फक्त दोन दिवस आले आणि दोन दिवस विधानसभेत आले. अडीच वर्षे कधीच दौरा केला नाही. किमान आता विरोधी पक्षात असल्यामुळे ते मराठवाड्याचा दौरा करताहेत. मी त्यांना दौऱ्यासाठी शुभेच्छा देतो, असा टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना लगावला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जी मागणी करतील, ती ऐकून घेणे ही आमची जबाबदारी आहे. सरकार योग्य पद्धतीने नुकसानभरपाई विषयी निर्णय घेईल. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांचेही स्वागत केले जाईल.
बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान आठ हजार रुपये खटाखट देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यांना भाजपवर टीका करण्याचा अधिकार नाही. बिहारमध्ये मत खरेदी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा त्यांचा आरोप दिशाभूल करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने व्यवसाय व प्रशिक्षणावर आधारित योजना तयार केली. हर लाडकी बहीण योजनेसारखी योजना नाही. केंद्र आणि राज्य सरकार रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ७५ लाख महिलांना स्वयंरोजगारासाठी दहा हजार रुपये देणे, अशी ही योजना आहे. त्यात मत खरेदी करण्याचा प्रश्नच कुठे येत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी महिलांसाठी अशा प्रकारची योजना का राबवली नाही. त्यांना कुणी थांबवले होते, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. हे आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाहीत. आज शेतकरी मोठ्या संकटात आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
अमरावतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करणे ही काँग्रेसची कृती अयोग्य आहे. मी अमरावतीत आहे. त्यांनी मला निवेदन द्यायला हवे होते. मी निवेदन घ्यायला गेलो असतो. पण गाडी अडवणे, काळे झेंडे दाखवणे हे योग्य नाही. आम्हाला देखील त्याच पद्धतीची कृती करावी लागेल. जशास तसे करावे लागेल. ज्यांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कारवाई करण्याविषयी मी पोलीस आयुक्तांना सूचना देणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.