अमरावती: एका तरूणीचा हात पिरगाळून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या विरोधात गुन्हा घडल्यानंतर चोवीस तासांत सबळ पुराव्यानिशी चांदूर रेल्वे पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी तरूणी ही रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आपल्या घरी घरगुती काम करीत असताना तिच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला. तरूणीच्या घरी कुणी नसल्याची संधी पाहून तू माझ्यासोबत बोलत का नाहीस, अशी विचारणा तिला केली. आरोपीने पीडित तरूणीचा हात पिरगाळला आणि विनयभंग केला.
या घटनेची फिर्याद पीडित युवतीने ४ मे रोजी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ तपासाची सूत्रे हलवली आणि आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विना पंडे, हेड कॉन्स्टेबल शिवाजी घुगे, राहुल इंगळे, प्रशांत ढोके यांनी लगेच गावात पोहचून आरोपीचा शोध घेतला, त्यावेळी तो घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
लगेच सरकारी पंचांच्या समक्ष पंचनामा तयार करण्यात आला. ई-साक्ष मध्ये नोंदी घेण्यात आला. तसेच फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदविण्यात आले. त्याच प्रमाणे न्यायालयात फिर्यादीचा जबाब दाखल करण्यात आला.
रविवारी ४ मे रोजी हा विनयभंगाचा गुन्हा घडला. त्याच्या दुसऱ्या दिवशी चांदूर रेल्वे पोलिसांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र तयार केले आणि ५ मे रोजी सकाळी ११ वाजता चांदूर रेल्वे येथील न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही गुन्हा घडल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक विशाल आनंद तसेच अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय आकरे, महिला पोलीस उपनिरीक्षक विना पंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी घुगे, राहुल इंगळे, प्रवीण मेश्राम, प्रशांत ढोके यांनी पार पाडली.
जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी वेळेत आरोपपत्र दाखल करणे महत्वाचे ठरत असते. विनयभंगासारख्या संवेदनशील प्रकरणांमध्ये पीडितेचे नाव उघड होऊ नये, यासाठी गोपनीयता पाळणे गरजेचे असते. अशा स्थितीत चांदूर रेल्वे पोलिसांनी सतर्कता बाळगून केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.