अमरावती : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी गेल्या वर्षी नागपूर येथे केलेला सलग २४ तास डोसे वनविण्याचा स्वत:चाच विश्वविक्रम मोडला असून अमरावतीत त्यांनी ‘न थांबता २५ तास’ डोसे तयार करण्याच्या नवीन विश्वविक्रमाला आज त्यांनी गवसणी घातली. शनिवारी सकाळी ७ वाजेपासून त्यांनी डोसे बनविण्यास सुरूवात केली होती. रविवारी सकाळी ८ वाजता या उपक्रमाची सांगता झाली. उपस्थितांनी टाळ्या वाजवून विष्णू मनोहर यांचे कौतूक केले.

हा उपक्रम अनुभवण्यासाठी अमरावतीकरांनी एमआयडीसी मार्गावरील गुणवंत लॉनवरील ‘विष्णूजी की रसोई’ मध्ये मोठी गर्दी केली होती. २५ तासांमध्ये विष्णू मनोहर यांनी तब्बल १५ हजार ७७३ डोसे तयार केले. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली. आजवर तीस विक्रमांची नोंद विष्णू मनोहर यांच्या नावावर असून, अमरावतीत नोंदवलेला हा त्यांचा एकतिसावा विक्रम आहे. पुढील विक्रम हा अमेरिकेत नोंदविण्याचा मानस विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला असून ते त्या ठिकाणी सलग २६ तास डोसे बनविणार आहेत.

शनिवारी सकाळी ७ वाजेपासून या उपक्रमाला सुरूवात झाली होती. पहिल्या दोन तासांत सुमारे ७५० डोसे तयार झाले होते. पहिला तयार झालेला डोसा शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर येथे पाठविण्यात आला. हा विश्वविक्रम नोंदवताना विष्णू मनोहर यांना सुमारे ५०० किलो उडीद डाळ आणि तांदळाचे बॅटर आणि शंभर किलो चटणी लागली. तीन तव्यांवर एकाचवेळी त्यांनी डोसे तयार केले. यावेळी समोरील मंचावर गीत-संगीत कार्यक्रमाचे सादरीकरणही झाले.

सलग २५ तास डोसे बनवण्याचा विक्रम अमरावतीत नोंदवला जात असताना, शनिवारी सकाळपासून विष्णू मनोहर यांचे विश्वविक्रमी काम पाहण्यास अमरावतीकरांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे याठिकाणी तयार होणारे डोसे हे निःशुल्क चाखायला मिळत होते. मोठी रांग करून खवय्ये डोस्यांचा चटणीसह आस्वाद घेत होते. शनिवारी दिवसभर आणि रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत चवदार डोशांची मेजवानी विष्णू मनोहर यांच्या विक्रमाच्या निमित्ताने अमरावतीकरांना मिळाली. या उपक्रमाला अमरावतीकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे विष्णू मनोहर यांनी सांगितले. रात्री एक-दोन वाजता देखील सुमारे तीनशे अमरावतीकर माझा उत्साह वाढविण्यासाठी हजर होते. नवीन विश्वविक्रम नोंदवणे, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असे ते म्हणाले.