अमरावती : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज सकाळी स्वत:चाच विश्वविक्रम मोडण्याकडे वाटचाल सुरू केली. सुमारे वर्षभरापुर्वी नागपूर येथे सलग २४ तास डोसे बनविण्याचा अफलातून विक्रम त्यांनी नोंदवला होता. आता त्यात पुढचे पाऊल टाकून अमरावतीत ‘न थांबता २५ तास डोसे बनविणे’ या विश्वविक्रमाला ते गवसणी घालणार आहेत. अमरावतीकरांनी चटणीसह या डोस्यांचा आस्वाद घेण्यासाठी एमआयडीसी मार्गावरील गुणवंत लॉनवरील ‘विष्णूजी की रसोई’ मध्ये मोठी गर्दी केली आहे.

या ठिकाणी खवय्यांना नि:शुल्क डोसे दिले जात आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर डोसे वितरील केले जात आहेत. यासोबत हिंदी, मराठी गाणी गायन, विविध कलांचे सादरीकरण हे मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरू आहेत. सकाळी ७ वाजेपासून या उपक्रमाला सुरूवात झाली. पहिल्या दोन तासांत सुमारे ७५० डोसे तयार झाले. पहिला तयार झालेला डोसा शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर येथे पाठविण्यात आला. या उपक्रमाची सांगता उद्या सकाळी ८ वाजता होणार आहे. या उपक्रमाला अमरावतीकरांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. गीत गायनाचा कार्यक्रम सादर होत आहे, अशी माहिती विष्णूजी की रसोईच्या संचालिका ओजस्वीनी असनारे यांनी दिली. अंध विद्यालय, मूक बधीर विद्यालय, वृद्धाश्रम आदी संस्थांना देखील डोसे वितरीत केले जाणार आहेत.

गुणवंत लॉन येथे एका मंचावर विष्णू मनोहर चार तव्यांवर डोसे तयार करीत आहेत, तर समोर दुसऱ्या मंचावर हौशी कलावंत, गायक आपल्या कलेचे सादरीकरण करीत आहेत. सकाळी विश्वविक्रमाला प्रारंभ करण्यापुर्वीच लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. विष्‍णू मनोहर यांनी गेल्या वर्षी नागपूर येथे ‘सलग २४ तास डोसे’ करण्याचा नवा विश्वविक्रम रचला होता. त्यांनी २४ तासात तब्बल १४ हजार ४०० डोसे तयार केले होते. विश्व विक्रम नोंदविताना विष्णू मनोहर यांना डोशाचे ५०० किलो बॅटर आणि शंभर किलो चटणी लागली होती. अमरावतीत त्याहून अधिक उडद डाळ, तांदूळ डोस्यांचे बॅटर तयार करण्यासाठी लागली आहे. सोबतच चटणीसाठी खोबरे, दही, मिर्ची, मोहरी, मिठ आणि कढीपत्ता हे जिन्नस उपयोगात आणले जात आहेत. विष्णू मनोहर यांनी यापुर्वी अयोध्येतील सात हजार किलोचा ‘राम हलवा’, सर्वात मोठा व्हेज कबाब, सर्वात मोठा पराठा, सर्वात मोठी पुरणपोळी, ५२ तास न थांबता स्वयंपाक असे ३० च्यावर विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत.