नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) राष्ट्रीय चिंतन शिबीर नागपुरात सुरू आहे. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या या पक्षाच्या शिबिराकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिबिराला राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि यांच्यासह देशभरातून प्रमुख नेते, सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, सेल अध्यक्ष आणि राष्ट्रीय पदाधिकारी असे सुमारे पाचशेहून अधिक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ओबीसी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस हे ओबीसींसाठी मंत्रिमंडळातील एकमेव आशेचे किरण आहेत, असे वक्तव्य केले. त्यावर अजित पवार यांनी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी केला.
काय म्हणाले अजित पवार
अजित पवार म्हणाले, मित्रांनो मी माझ्या सामाजिक ओळखीबद्दल सांगतो. मी मराठा समाजामध्ये जन्माला आलेला एक कार्यकर्ता आहे. पण महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा असतील, ओबीसी, मागासवर्गीय, धनगर, तेली, आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख, नवबौद्ध यासह समाजातील प्रत्येक घटकांच्या विकासाची आणि उन्नतीची जबाबदारी माझी आहे. हे समजून मी काम करतो.
शिबीरात काय होणार
या शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती, युवा आणि महिला केंद्रित धोरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बूथ रचना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर विचारमंथन केले जाणार आहे. पक्षाची आजवरची आणि भविष्यातील वाटचाल, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील यश यावर सखोल चर्चा सुरू आहे.
युवकांची बदलती आकांक्षा आणि जीवनशैली, समाजातील विविध घटकांच्या अपेक्षा, तंत्रज्ञान आणि समाज यांचा परस्पर संबंध, शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, आत्मनिर्भरता, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कामगार वर्गाचे हित, पक्षाची विचारसरणी गावागावात पोहोचवण्याचे धोरण, या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. शिबिरात पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आजी-माजी आमदार व खासदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सहभागी झाले आहेत.
या शिबिराला यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर, प्रशांत पवार, तानाजी वणवे, विशाल खांडेकर, जानबा मस्के आणि नागपूर शहर व ग्रामीणचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.