नागपूर: मध्य प्रदेशातील छिंदवाडा, परासिया परिसरात कफ सिरफ घेतल्याने आठ मुलांचा मृत्यू झाला असून नागपुरातील विविध रुग्णालयांत अनेक रुग्ण दाखल झाले आहेत. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) औषध शाखेने नागपुरातील कफ सिरफचे नमुने तपासणीला पाठवले असून अहवाल येईस्तोवर विक्री थांबवण्याची सूचना केली आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.

छिंदवाडा व परासिया परिसरातून १४ रुग्ण नागपुरातील मेडिकलमध्ये तर एम्समध्ये मागील दीड महिन्यात सुमारे ९ मुले अत्यवस्थ अवस्थेत दाखल झाली. त्यापैकी मेडिकलमध्ये सहा तर एम्समध्ये एक रुग्ण दगावला. इतर एका रुग्णालयातही एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या मेडिकलला चार रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर असून दोघे अतिदक्षता विभागात आहेत. दोन रुग्ण उपचारासाठी इतर रुग्णालयात गेले. दरम्यान, नागपूर एफडीएकडून शासकीय रुग्णालयांत तपासणी केली असता येथे एकाही ठिकाणी या सिरफचा पुरवठा झाला नसल्याचे पुढे आले. एका खासगी औषध विक्रेत्याकडे मात्र या कंपनीच्या विक्रीपूर्वी सिरफचा साठा आढळला. त्याचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत. अहवाल येईपर्यंत विक्री न करण्याची सूचना विक्रेत्याला करण्यात आली आहे. या वृत्ताला नागपुरातील एफडीएतील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

मध्य प्रदेशात औषधांवर बंदी

सिरपमुळे मुलांची प्रकृती बिघडण्याच्या गंभीर घटनेनंतर मध्य प्रदेश अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने नागपुरातील मेडिकलमधील बालरोग विभागाला भेट दिली. त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडून संबंधित कफ सिरपची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. औषधांच्या बॉटल सीलबंद नसल्याने ते नमुने घेऊ शकले नाहीत. मात्र, मध्य प्रदेशात या संबंधित कफ सिरपच्या बॅचेसच्या विक्रीवर तत्काळ बंदी घालण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

प्रकरण काय ?

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे सहा मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. कफ सिरपमुळे मुलांचे मूत्रपिंड निकामी झाले. त्यांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल या रसायनाचा समावेश असल्याचा संशय आहे. २० सप्टेंबरनंतर छिंदवाड्याच्या विविध भागात सर्दी, खोकला आणि तापामुळे अनेक मुलांनी लघवी करणे बंद केले होते. त्यामुळे छिंदवाडा जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्ड्रिफ आणि नेक्स्ट्रो-डीएस कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आहे आणि पालक, डॉक्टर आणि वैद्यकीय संचालकांसाठी एक सल्लागार जारी केला आहे.