चंद्रपूर : राज्यातील महायुती सरकारने मराठा समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केले. ‘सारथी’च्या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससीचे यशस्वी विद्यार्थी तयार केले. यापूर्वी मी स्वत: मुख्यमंत्री असताना व त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
चिमूर येथे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यातर्फे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या घोषणेबाबत भाष्य केले. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मराठा समाजाकरिता महायुती सरकारने अर्थात आमच्या सरकारने जे कार्य केले, ते सर्वांना माहिती आहे.
विशेषत: मराठा समाजाला आरक्षण देणारे आमचेच सरकार आहे. मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक तयार केले, मराठा समाजाकरिता शिक्षणाची व्यवस्था आपण केली. मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणाकरिता तसेच राहण्याकरिता विशेष भत्ता देण्याची व्यवस्था केली.
स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाज जास्तीत जास्त संख्येने आला पाहिले, याकरिता ‘सारथी’च्या माध्यमातून काम केले. अनेक ‘आयएएस’ अधिकारी तयार केले. ‘एमपीएससी’चे यशस्वी विद्यार्थी ‘सारथी’च्या माध्यमातून तयार केले. राज्य सरकारने मराठा समाजासाठी खूप माेठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, माजी आमदार मितेश भांगडीया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुण्य करणाऱ्यालाच भागवत ऐकण्याची संधी
जो पुण्य करतो त्यालाच भागवत ऐकण्याची संधी मिळते. भागवत आध्यात्मिक परंपरेला समृद्ध करतो. या माध्यमातून विविध बोधकथा समोर येतात, त्यानेही जीवन समृद्ध होते. जगातील सर्वाधिक प्राचिन आणि सातत्यपूर्ण संस्कृती ही सनातन अर्थात हिंदू संस्कृती आहे. उत्खननातून दहा हजार वर्षापूर्वीची पूर्ण विकसित झालेली शहरे सापडली आहेत. त्या शहरात आज ज्या प्रकारे महिला वेशभूषा करतात, पूजा करतात, त्याच प्रकारे पूर्वी पूजा, भाषा व वेशभूषा होती. संपूर्ण जगात सनातन संस्कृती मानली जाते. ज्ञानेश्वर माऊलींनी आठशे वर्षापूर्वी जो विचार मांडला, तो वैश्विक विचार होता. त्यांनी संपूर्ण विश्वाकरिता आशीर्वाद मागितला होता. सर्वांच्या सहजीवनाचा विचार भारतीय संतांनी मांडला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.