नागपूर : आंदोलन गुंडाळण्यात माहिर असलेल्या फडणवीस सरकारने इंग्रजी वर्तमान पत्र आणि न्यायालयाच्या आडून नागपूरचे शेतकरी आंदोलनही गुंडाळण्याचे प्रयत्न केला. त्याचा प्रचंड संताप लाखोंच्या संख्येने कर्जमाफीच्या मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या मनात आहे. ही खदखद रस्त्यावर बसलेल्या वृद्ध शेतकऱ्यांसोबतच आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी पुत्र युवक व गावात राहणाऱ्या मुलांच्या मनातही आहे.

बुधवार रात्री जेव्हा पोलीस न्यायालयाचा आदेश घेऊन आंदोलनस्थळी आले तेव्हा आंदोलक कमालीचे संतप्त झाले होते. रात्री झालेल्या सभेत एका अल्पवयीन मुलाने शेतकऱ्यांसोबत बोलताना जोशपूर्ण भाषण केले. फडणवीस साहेब कोणतीही सूचना न देता एक पत्र पाठवून आम्हाला जेल मध्ये पाठवण्याची भीती दाखवता, पहिली गोळी माझ्या छातीवर चालवा नंतर बच्चूभाऊवर चालवा असे हा चिमुकला म्हणाला. त्याच्या या जोशपूर्ण भाषणाने उपस्तित शेतकऱ्यांचा उत्साह अधिक वाढला.

रस्ता मोकळा करा, अन्यथा तुरुंगात जा असे पत्र घेऊन बुधवारी जेव्हा पोलीस आले तेंव्हा आंदोलक कमालीचे आक्रमक झाले होते. रात्री दोन राज्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यावर बच्चू कडू यांनी मुंबईत सरकारसोबत बैठकीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली व महामार्ग मोकळा केला. त्यानंतर रस्त्यालगत शेतकरी बसले, तेथे अनेक शेतकऱ्यांची भाषणे झाली, त्यातच एक चिमकुलाही बोलला, तो नुसताच बोलला नाही तर एखाद्या फर्ड्या वक्तव्याला लाजवेल असे भाषण त्याने केले. तो म्हणाला “पोलीस एक पत्र घेऊन आले, म्हणाले रस्ता खाली करा अन्यथा कारागृहात जा, मी म्हणतो फडणवीस साहेब पोलीस असो किंवा सरकारचे अधिकारी ते जे अन्न खातात ते शेतकरी पिकवतात, तुम्ही त्यांनाच कारागृहात पाठवता, त्यांना अटक करायची अ सेल, त्यांच्यावर गोळ्या झाडायच्या असेल तर पहिले तुम्हाला मला अटक करावी लागले ,माझ्यावर गोळ्या झाडाव्या लागेल.

वर्षभरापासून बच्चू कडू शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन करीत आहे, तुम्ही एकत्र आले असते तर आंदोलन करण्याची वेळच आली नसती, सरकार लबाड आहे, निवडणुकीपूर्वी म्हणते सातबारा कोरा , निवडणुका झाल्यावर म्हणते कर्ज भरा, सरकारने १५०० रुपये दिले तर डोळे मिटून लोकांनी ठप्पे मारले,आता भोगा त्याचे पाप, सरकारने कर्जमुक्ती केली, हमी भाव दिले तर आम्हीच आमच्या लाडक्या बहिणींना २५०० रुपये देऊ, असे हा चिमुकला म्हणाला, जो शेतकरी नागपूर सोडून आंदोलनातून जाईल तो शेतकरीच नाही, असेहीत्याने स्पष्ट केले.