चंद्रपूर : अयोध्या येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी आलापल्ली व बल्लारपूर येथून चिराण सागवान काष्ठ भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. या भव्य शोभायात्रेसाठी संपूर्ण चंद्रपूर व बल्लारपूर शहर रामनामाच्या जपात तल्लीन झाले आहे.

राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात ही भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेसाठी चंद्रपूर व बल्लारपूर शहर एखाद्या नववधूसारखे सजवण्यात व सुशोभित करण्यात आले आहे. बल्लारपूर शहरात मुख्य मार्गावर सर्वत्र स्वागतकमानी लावण्यात आल्या आहेत. रोषणाईसोबत पहाटेपासून ध्वनिक्षेपकावर रामनामाची धून सुरू आहे. संपूर्ण बल्लारपूर शहर रामनामात तल्लीन झाले आहे. चंद्रपूर शहरातदेखील महाकाली मंदिर ते गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, वरोरा नाका, चांदा क्लबपर्यंत सजावट करण्यात आली आहे. हिरव्या झाडांवर रोषणाई, तोरण, पताका, रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी, स्वागतासाठी मंच तयार केले आहेत. प्रभू श्री रामचंद्राच्या मोठमोठ्या प्रतिमा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मोठ्या प्रतिमा असलेले स्वागतद्वार, ऐतिहासिक महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, ऐतिहासिक अंचलेश्वर गेट, जटपुरा गेट सजवण्यात आले आहेत. या यात्रेचे चौकाचौकात स्वागत करण्यात येणार असल्याने तशी तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा – यवतमाळ : अमृत योजनेत साडेसहा कोटींची अनियमितता; कार्यकारी अभियंत्याला अटक

प्रत्येक ठिकाणी हिंदू धर्माची गुढी उभारली आहे. या संपूर्ण महोत्सवाला सर्वपक्षीय स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असला तरी संपूर्ण महोत्सवावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची छाप आहे. तिरुपती येथील बालाजी मंदिराने १५ हजार मंदिरांचे प्रसाद लाडू भाविकांसाठी पाठवले आहेत. तिरुपती देवस्थानाला आपण सागवान काष्ठ अयोध्येच्या राम मंदिर निर्माणासाठी पाठवत असल्याचे कळवले होते. त्यानंतर त्यांनी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसाद पाठवत असल्याचे सांगितले, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

हेही वाचा – नागपूर: कुनो राष्ट्रीय उद्यानात पाळणा हलला.. नामिबियातून आणलेल्या चित्त्यांनी दिला शावकाला जन्म

स्वप्नपूर्तीचा क्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीरामचंद्रांचे पिता महाराज दशरथ यांच्या मातोश्री इंदूमती या विदर्भाच्या. त्यामुळे आजीच्या भूमीतून नातवाच्या मंदिर निर्माणासाठी सागवान काष्ठ जात असल्याचा हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.