नागपूर : शांतताप्रिय नागपुरातील महाल परिसरात सोमवारी घडलेली हिंसाचाराची घटना दुर्भाग्यपूर्ण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तथापि, विरोधकांनी या घटनेचे राजकारण न करता समाजकंटकाना शोधण्यासाठी मदत करावी, असे आवाहन महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यांनी हिंसाचारातील सूत्रधाराला बेड्या ठोकण्याचे आवनहन केले.

हिंसाचारग्रस्त भागातील नागरिकांनी पोलिस आयुक्त कार्यालयात बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदने दिली. यादरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी मुलाहिजा ठेवू नका, सूत्रधाराच्या मुसक्या बांधा, असे स्पष्ट आदेश बावनकुळे यांनी पोलिसांना दिले. पोलीस आयुक्त कार्यालयातील बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर , महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलीस पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडवर असून, हिंसक घटनेत जवळपास ३४ पोलीस अधिकारी व शिपाई जखमी झाले असून, ५ नागरिक जखमी झाले आहेत, त्यातील तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. घटनास्थळी ५५ वाहने जाळण्यात आली आहेत. खरे तर, सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात होत्या.त्यामुळे समाजात द्वेष निर्माण झाला. घटनेला जे जबाबदार आहेत त्या समाजकंटकांना पोलीस लवकरच शोधून काढतील. सोशल मीडियावरून ज्यांनी वातावरण बिघडविण्याचे काम केले त्यांचा शोध महत्त्वाचा आहे. त्या सर्वांवर आमची करडी नजर असल्याचेही बावनकुळे म्हणाले. याप्रसंगी आमदार प्रवीण दटके उपस्थित होते.

सी.सी.टि.व्ही. फूटेजची तपासणी

हिंसाचार झालेल्या परिसरातील सी.सी.टि.व्ही. कॅमेरामध्ये जे फूटेच आहे ते तपासून घेतले जाईल. कोणऱ्याही स्थितीत नागपूरच्या शांततेला यानंतर गालबोट लागणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. या घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तत्काळ पंचनामे सुरु झाले आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले. नागपूरसह राज्यात अन्यत्र अशा घटना घडणार नाही याची काळजी राज्य शासन घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयात जखमींची भेट

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठकीनंतर न्यू इरा हॉस्पिटल येथे भेट देऊन जखमी पोलीस अधिकारी व नागरिकांची विचारपूस केली. त्यांच्यासमवेत आमदार प्रवीण दटके, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार प्रविण दटके यांनी उपस्थित जखमी रुग्णांच्या नातेवाईकांशी पालकमंत्री बावनकुळे यांच्यासमवेत संवाद साधून दिला. उपचाराबाबत कोणतीही हलगर्जी होता कामा नये, अशी सूचना त्यांनी पडू नये हॉस्पिटल व्यवस्थापनाला केली.