लोकसत्ता टीम

भंडारा : डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप असं म्हणतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आजारी, जखमी रुग्णाला वाचवणारे, जीवदान देणारे हे डॉक्टर प्रत्येक पेशंटसाठी देवासमानच असतात. मात्र कधी याच डॉक्टरमुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला तर? त्याच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाला यातना सहन कराव्या लागल्या तर ? असाच एक धक्कादायक प्रका भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात घडला आहे.

प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेच्या गर्भपिशवीत चक्क कापडच राहून गेलं. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. अखेर त्या महिलेवर पुन्हा शस्त्रक्रिया करून, तिच्या गर्भपिशवीतून ते कापड बाहेर काढण्यात आले आणि तिला वेदनांपासून मुक्ती मिळाली. या घटनेमुळे रुग्णांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

आणखी वाचा-एमपीएससी: पावसाळ्यापूर्वी पीएसआय पदाची मैदानी चाचणी घ्या, विद्यार्थ्यांची मागणी

तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील हिमानी हरिराम पांडे ही महिला पहिल्या प्रसूतीकरीता उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे दि. २४ एप्रिला दाखल झाली होती. दि. २५ एप्रीलला तिची नॉर्मल प्रसूती झाली. नॉर्मल प्रसूतीनंतर तुला अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे तेथे कापड ठेवण्यात आले. अती रक्तस्त्राव होत असल्यास गर्भ पिशवी जवळ कापड ठेवले जाते आणि ते कापड १२ ते २४ तासाच्या आत काढावे लागते, अशी माहिती एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

मात्र उपजिल्हा रुग्णालयातील एका स्त्री रोग तज्ञ व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळंतपण झाल्यानंतर गर्भ पिशवीजवळ लावलेला कापड न काढताच ओल्या बाळंतिणीला दि. २७ तारखेला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र घरी गेल्यावर तीन ते चार दिवसांनी हिमानी हिला असह्य वेदना होवू लागल्या. तसेच घाण वास येऊ लागला. त्यामुळे हिमानी घाबरली आणि तिने सगळं पतीला सांगितले. त्यांनी तात्काळ तुमसर येथील खाजगी रुग्णालय गाठले. खाजगी रुग्णालयात तपासणी दरम्यान तिच्या गर्भाशयात कापड राहिल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. रक्ताने माखलेले आणि कुजलेले कापड वेळीच उपचार करून काढण्यात आला. मात्र तो कापड २४ तासात काढणे गरजेचे असताना सदर कापड ओल्या बाळंतिणीच्या गर्भाशयात पूर्ण कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे बाळंतिणीच्या शरिरात इन्फेक्शन पसरले होते. वेळेत उपचार झाल्याने सुदैवाने ती बचावली. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिला असह्य वेदना आणि मनस्ताप सहन करावा लागला.

आणखी वाचा-तब्बल २७६ विमान, हेलिकॉप्टर प्रचारासाठी नागपुरात; विमानतळाला असा झाला लाभ

या घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. वैद्यकिय अधिकारी, स्त्री रोग तज्ञ, लहान मुलांचे डॉक्टर, भुलतज्ञ वेळेवर हजर राहत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.

पीडित महिलेच्या पतीने मागितली नुकसानभरपाई

इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरण्याआधी ते कापड आम्ही खाजगी रुग्णालयात डॉक्टरांमार्फत काढून टाकल्याने जीवाचा धोका टळला. मात्र तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या अशा निष्काळजीपणामुळे त्रास सहन करावा लागला. याप्रमाणे आणखीही अनेक लोकांना कोणता ना कोणता त्रास सहन करावा लागला असेल, काहींना जीवही गमवावा लागतो. याप्रकरणी चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी व आम्हाला झालेला आर्थिक भुर्दंड द्यावा, अशी मागणी पीडित महिलेच्या पतीने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संपूर्ण प्रकरणात काय झालं याची माहिती वरिष्ठांना दिली आहे. त्यानुसार चौकशी सुरू असून यामध्ये कोणी दोष आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, नितीन मिसूळकर यांनी सांगितले.