scorecardresearch

सावधान! ढगाळ व धुके सदृश्य वातावरणाने पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढणार

गेल्या दोन दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यात सूर्याचे दर्शन झाले नाही. या सर्व परिस्थितीचा परिणाम आता पिकांवर होत आहे.

सावधान! ढगाळ व धुके सदृश्य वातावरणाने पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढणार
ढगाळ व धुके सदृश्य वातावरणाने पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढणार (संग्रहित छायाचित्र)

गेल्या काही दिवसांमध्ये हवामानात अचानक बदल होऊन ढगाळ व धुके सदृश्य वातावरण निर्माण झाले. तापमानात घट झाली असून गारठा वाढला आहे. त्याचा दुष्परिणाम पिकांवर होत आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उपाययोजना सुचवल्या आहेत.

हेही वाचा- मज्जाच मज्जा…हत्तींना मिळणार १५ दिवसांची रजा!

सध्या सर्वत्र धुके सदृश्य ढगाळ वातावरण आहे. गारव्यामध्ये देखील चांगलीच वाढ झाली. गेल्या दोन दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यात सूर्याचे दर्शन झाले नाही. या सर्व परिस्थितीचा परिणाम आता पिकांवर होत आहे. तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढीसाठी पोषक वातावरण आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावर होत असल्यास कीटकनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. रात्रीच्या व दिवसाच्या तापमानातील अधिक फरकासह धुक्याच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे पीक करपण्याची शक्यता आहे. त्यावर तुषार सिंचन दिल्यास फायदा होऊ शकतो. तुरीवरील मर रोगासाठी पिकाची दीर्घकालीन फेरपालट अवलंबावी. रोग प्रतिबंधक जाती वापराव्यात. शेतात शेणखत किंवा कंपोस्ट खतात एकरी दोन किलो ट्रायकोडर्मा बुरशी टाकून जमिनीत मिसळवावी आदी उपाययोजना शास्त्रज्ञांनी सुचवल्या आहेत.

हेही वाचा- धुके मुक्कामी, थंडी सुसह्य!; बळीराजा चिंताग्रस्त

वातावरणातील बदलामुळे गहू पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसेच गव्हावर तांबेरा हा बुरशीजन्य रोग येण्याची देखील शक्यता आहे. त्यावर उपाययोजनांसाठी फवारणी सुचवली आहे. हरभरा पिकात घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एकरी १० पक्षी थांबे उभारावे. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रभावी जैविक नियंत्रणासाठी ‘एचएनपीव्ही’ विषाणूचा फवारा प्रति हेक्टरी ५०० विषाणूग्रस्त अळ्यांचा अर्क ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, आदी सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा- नक्षलवाद्यांचा हैदोस, सर्वेक्षणासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

पिकांवरील सर्व प्रकारच्या किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी सुचवलेल्या उपाययोजना शेतकऱ्यांनी अवलंब कराव्या. त्यामुळे पीक सुरक्षित राहू शहतील, अशी माहिती नागपूर कृषी महाविद्यालयाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 19:57 IST

संबंधित बातम्या