नागपूर जिल्ह्य़ातील सर्व १२ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या भाजपला सहा जागा राखण्यासाठी घाम गाळावा लागला. तर भाजपला शहरात दोन आणि ग्रामीण तीन ठिकाणी अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील भाजपची विजयी मिरवणूक व जल्लोष कार्यक्रम रद्द करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सायंकाळी नागपुरात मुंबईहून येणार होते. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र घेतल्यानंतर फडणवीस जल्लोष कार्यक्रमात सहभागी होणार होते. तसेच एका विजयी मिरवणुकीमध्ये सहभागी होणार होते. त्यासाठी स्थानिक भाजपने जय्यत तयारी केली होती. मात्र राज्यात भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्याने ते रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रमाणपत्र घेण्यासाठी मतमोजणी केंद्रावर पोहचले. त्यानंतर ते लगेच मुंबईला परतले. मुख्यमंत्र्यांची विजयी मिरवणूकही रद्द करण्यात आली आहे, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. भाजपला नागपूर आणि विदर्भातही अपेक्षित यश मिळालेले नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी  काही ठिकाणी अनपेक्षित विजय मिळवला आहे. युतीला, भाजपाला बंडखोरांचा फटका बसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे. अपेक्षेइतके यश भाजपाला मिळालेले नाही हे निकालाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट  होत आहे.

फडणवीस हे पश्चिममधून एक वेळ आणि आजच्या विजयानंतर त्यांनी दक्षिण-पश्चिममधून हॅटट्रिक साधली आहे. मात्र नागपूर जिल्ह्य़ात भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. भाजपने नागपुरात मुख्यमंत्री यांच्यासह चार जागा जिंकल्या आहेत. दक्षिणमध्ये मोहन मते, मध्य मध्ये विकास कुंभारे, पूर्वमध्ये कृष्णा खोपडे, कामठीत टेकचंद सावरकर, हिंगणा येथे समीर मेघे विजयी झाले.

काँग्रेस सावनेरमध्ये सुनील केदार, उमरेड राजू पारवे, उत्तर नागपूरमध्ये डॉ. नितीन राऊत आणि पश्चिम नागपूरमध्ये विकास ठाकरे यांनी विजयी पतका फडकावली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने काटोलची जागा खेचून आणली आहे. रामटेकमध्ये शिवसेनेचे बंडखोर अ‍ॅड. आशीष जयस्वाल यांचा विजयी झाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कापल्याचा फटका भाजपला बसला. कामठी, मध्य नागपूरची जागा भाजपला मिळाली तरी तेथे काँग्रेसने अतिशय कडवी झुंज दिली.

नागपूर जिल्ह्य़ातील जेमतेम सहा जागा राखण्यात यश आल्याने निराश मुख्यमंत्र्यांनी विजयी जल्लोषाचा कार्यक्रम रद्द केला.