यवतमाळ : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीने अंदाजे तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकरी मदतीची मागणी करत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोहासाठी उपस्थित राहुनही शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबद्दल कुठलीही घोषणा केली नाही. उलट, येथील दीनदयाल प्रबोधिनीत सजवलेल्या बैलबंडीत सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात फेरफटका मारून आनंद लुटल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आजही अनेक भागात पूरपरिस्थती आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके खरडून गेली आहेत. लगतचा मराठवाडा पाण्याखाली आहे. अशावेळी सेंद्रिय, विषमुक्त शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी येथील दीनदयाल प्रबोधिनीत आल्यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत दिलासा देणारा निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र त्यांनी शेतकऱ्यांना रासायनिक शेतीकडे न वळता पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन व अंत्योदय विचारांचा अंगीकार करून विषमुक्त शेतीचे प्रयोग राबविण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करत आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळच्या दौऱ्यात बैलगाडीत फिरून आनंद झाल्याचं फेसबुकवर लिहिताहेत, याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला. शेतकरी मरत असताना सजवलेल्या बैलबंडीतून मुख्यमंत्र्यांचा धडाक्यात ‘पीआर’ सुरू असल्याची टीका समाज माध्यमांतून होत आहे.
मुख्यमंत्री आढावा घेत भरीव मदत देण्याचं आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात शेतकरी अजूनही भरीव मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत. कारण पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय मदत करायची नाही, असा चंग मुख्यमंत्र्यांनी बांधलेला आहे, अशी टीका समाज माध्यमातून करण्यात आली. राज्यात २२ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत देणं गरजेचं आहे, याचा मुख्यमंत्र्यांना विसर पडलेला दिसतोय. राज्यात नैसर्गिक संकट आलंच नाही, अशा मुडमध्ये मुख्यमंत्री दिसतायत, अशी टीका एका युजरने केली आहे. संकट काळात नागरिकांची काळजी घेणं, मुख्यमंत्र्यांचं आद्यकर्तव्य असतं. पण मुख्यमंत्री फडणवीस मात्र बैलगाडीत फोटो काढून पीआर करण्यात दंग आहेत. जणू काही झालंच नाही, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय, अशी टीका समाज माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या बैलबंडीतील फेरफटक्यावरून सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी दीनदयाल प्रबोधिनीत बैलबंडीतून फेरफटका मारण्याऐवजी जिल्ह्यातील उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावून परिस्थिती बघायला हवी होती. शेती खरडून गेल्याचे दिसत असतना पंचनाम्याचे सोंग घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या दु:खाशी काहीच घेणे देणे नाही. अतिवृष्टीत पुरात वाहुन गेलेल्या पिकांप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनाही पुरात वाहून गेल्या. अशावेळी बैलगाडीतून आनंदाने फिरणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेचा पंचनामा व्हायला हवी, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी दिली.