वन्यजीवप्रेमींना शंका
जगभरातील वन्यजीवप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या ‘जय’ संदर्भात मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांनी तो जिवंत असल्याचे दावे मोठय़ा दिमाखात केले. मात्र, ‘जय’ खरंच जिवंत आहे का, यावर वन्यजीवप्रेमींनाही शंका यायला लागली आहे. ‘जय’ बेपत्ता असल्याचे सर्वात आधी प्रसारमाध्यमांनीच उघडकीस आणले आणि वनमंत्री त्याला ‘वाघांबाबत’चा कळवळा, असे नाव देऊन मोकळे झाले. ‘जय’ संदर्भात गेल्या काही दिवसांपासून जो गोंधळ सुरू आहे, तो पाहता व्याघ्रदिनाच्या दिमाखदार सोहोळ्यावरही वन्यजीवप्रेमींनी टीका केली आहे.
तब्बल तीन महिन्यांपासून ‘जय’चे अस्तित्व उमरेड-करांडला अभयारण्यातून नाहीसे झाले आहे. नागझिरा अभयारण्यातून उमरेड-करांडला अभयारण्यातील त्याचे स्थलांतरण साऱ्यांचे लक्ष वेधून गेले. या अभयारण्याला त्याने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. इतर अभयारण्यासारखे जंगल या अभयारण्यात नसतानाही केवळ ‘जय’ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत गेली. यात क्रिकेटर सचिन तेंडूलकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड यासारखे ‘सेलिब्रिटी’ही सुटले नाहीत. ‘जय’च्या भरवशावर १४ कोटींचा रोजगार मिळाल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनी व्याघ्रदिनाच्या कार्यक्रमात अभिमानाने सांगितले. मात्र, जयच्या भरवशावर कोटी रुपये कमावणारे सरकार त्याच्या सुरक्षिततेबाबत सपशेल अयशस्वी ठरले. त्याच्या भटकंतीची सवय पाहून वन्यजीवतज्ज्ञांनी त्याच्या शिकारीचा धोका वर्तवला. त्यानंतर वनखात्याने त्याला ‘रेडिओ कॉलर’ लावण्याचा निर्णय घेतला, पण एक नव्हे, तर दुसरीही कॉलर अयशस्वी ठरली. केवळ कॉलरच्या भरवशावर त्याची सुरक्षितता सोडून वनखात्याने बेजबाबदारपणाचा कळस गाठला. त्यांच्या या ढिसाळ वृत्तीचा फटका मात्र ‘जय’ला बसला. प्रसारमाध्यमांनी ही बाब उघडकीस आणल्यानंतर वनखात्याला जाग आली, पण तीन महिन्यांपूर्वी त्याची ‘रेडिओ कॉलर’ बंद झाल्याचे संकेत मिळाले तेव्हापासून आतापर्यंत या तीन महिन्यात त्याच्या शोधासाठी एकही पाऊल वनखात्याने उचलले गेले नाही, त्यामुळे वनखात्याची ही सावरासावर ‘जय’चे अस्तित्व शोधण्यास यशस्वी ठरेलच, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. ‘रेडिओ कॉलर’ नसतानाही कुठे ना कुठे त्याचे अस्तित्व कुणाला ना कुणाला दिसत होते. आता तर त्याच्या खाणाखुणाही आढळत नाहीत. स्वत:ची चूक लपवण्यासाठी कधी सरपंचाला, तर कधी वनमजूराला समोर करत ‘जय’सारखाच वाघ दिसल्याचा देखावा वनखात्याकडून करण्यात येत आहे. मात्र, ‘जय’ला जवळून ओळखणाऱ्या तज्ज्ञांच्या मते त्याचे अस्तित्व या जगातून नाहीसे झाल्याचीच दाट शंका व्यक्त करण्यात येत आहे.