नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहसा वरिष्ठ विद्यार्थ्याकडून कनिष्ठ वा नवीन विद्यार्थ्याची रॅगींग घेतल्याच्या घटना आपण नेहमीच एकत असतो. परंतु नागपुरातील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेत मात्र शल्यक्रिया विभागाच्या प्रमुखाने एका सहाय्यक प्राध्यापकासोबत धक्कादायक प्रकार केल्याची तक्रार पुढे येत आहे. या घटनेमुळे एम्स प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

नागपूर एम्समध्ये शल्यक्रिया विभाग प्रमुखाने सहाय्यक प्राध्यापकाला प्रचंड त्रास दिल्याची तक्रार एम्सच्या कार्यकारी संचालकांकडे करण्यात आली आहे. या तक्रारीत छळामध्ये विभाग प्रमुखाने काय केले त्याबाबतही सांगण्यात आले आहे. डॉ. सिद्धार्थ दुभाषी असे शल्यक्रिया विभाग प्रमुखाचे तर डॉ. विनोद पुसदेकर असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. या संपूर्ण घटनेमुळे एम्सच्या अधिकाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

डॉ. पुसदेकर यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी २९ जानेवारी २०२२ ते २५ जुलै २०२४ पर्यंत शस्त्रक्रिया विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात डॉ. दुभाषी यांनी त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला. या छमुळे ते नैराश्यात गेले. दरम्यान, डॉ. पुसदेकर यांनी जून २०२३ मध्ये एम्सच्या मानसोपचार विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. सुयोग जयस्वाल यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू केले. नंतर एप्रिल २०२४ मध्ये एम्समधून दीर्घ रजा घेऊन विश्रांतीचा निर्णय घेतला. नैराश्य कमी होत नसल्याने डॉ. पुसदेकर यांनी ६ जानेवारी २०२५ रोजी राजीनामा दिला व या सर्व प्रकारला डॉ. दुभाषी जबाबदार असल्याचा आरोप केला. माझ्यासारखे प्रकार इतरही डॉक्टरांसोबत घडत असून या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही डॉ. पुसदेकर यांनी केली आहे.

नागपूर ‘एम्स’बाबत…

मध्य भारतातील नावाजलेल्या वैद्यकीय संस्थेपैकी एक म्हणून नागपुरातील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेकडे (एम्स) बघितले जाते. एम्समध्ये सध्या ह्रदय, मुत्रपिंड, ह्रदय, मेंदू, औषधशास्त्र विभागासह इतरही विभागात रुग्णांवर अद्यावत उपचार होतात. येथे मुत्रपिंड प्रत्यारोपण सुरू झाले असून सिकलसेलसह इतरही रुग्णांवर अद्यावत उपचाराची सोय आहे.

विभागप्रमुखांनी आरोप फेटाळले

“डॉ. विनोद पुसदेकर यांचे विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम निकृष्ट होते. ते रुग्णही बघत नव्हते. त्यांना वारंवार समज दिली. परंतु काहीच सुधारणा झाली नाही. याबाबत विभागातील सगळ्याच शिक्षकांना कल्पना आहे. मानसिक छळ केल्याचा आरोप चुकीचा आहे.” डॉ. सिद्धार्थ दुभाषी, विभागप्रमुख, शल्यक्रियाशास्त्र विभाग, एम्स.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशी करणार

“सहाय्यक प्राध्यापकाकडून तक्रार आली आहे. समितीकडून चौकशी केली जात आहे. त्यात काही आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.” प्रा. डॉ. प्रशांत जोशी, कार्यकारी संचालक, एम्स.